अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेच्या आवारात केली नोटिसांची होळी
पालघर-योगेश चांदेकर
पालघरः राज्यातील अंगणवाडी सेविकांनी व अन्य कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबरपासून सुरू केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने त्यांना सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेच्या आवारात या नोटिसांची होळी केली तसेच धरणे आंदोलन केले
आदिवासी भागात तसेच नागरी प्रकल्पात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत. त्यापैकी पालघर जिल्ह्यात दोन हजार ७९९ अंगणवाडी केंद्रांमध्ये चार हजार ४१८ अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. तीन ते सहा वयोगटातील लाभार्थींना आहार शिक्षण व आरोग्यविषयक सेवा देण्याची जबाबदारी शासनाने त्यांच्यावर सोपवली आहे. संविधानाच्या ४७ व्या कलमाची पूर्तता करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अंगणवाडी कर्मचारी हे शासनाचे नोकर आहेत, असे समजले जात असले तरी त्यांना मात्र त्याबाबतचे कोणतेही फायदे दिले जात नाहीत. या कर्मचाऱ्यांना असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असतानाही राज्य शासन त्याची अंमलबजावणी करत नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, दरमहा पेन्शन द्यावी, योजनेच्या कामासाठी नवीन मोबाईल द्यावा आदी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस, सेविका चार डिसेंबरपासून संपावर आहेत. राज्यातील सुमारे ८४ लाख लाभार्थींना योजनेचे फायदे मिळत नाहीत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी असताना शासन हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी केला आहे.
दरम्यान, अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी करण्याच्या नोटींशीविरोधात पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व अन्य कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करून जिल्हा परिषद कार्यालयासमोर या नोटिसांची होळी केली तसेच धरणे आंदोलन केले.