नागपूर: नागपूर अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासावेळी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) अस्वच्छ असलेल्या विश्रांती गृहांबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या अस्वच्छ विश्रांतीगृहांसाठी समिती नेमण्यापेक्षा ठोस निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली. दरेकर यांच्या या मागणीला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई (Shambhu Raje Desai) यांनी या प्रशनी बैठक आयोजित करून बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे समाधानकारक उत्तर दिले.
आमदार प्रज्ञा सातव यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी एसटी महामंडळात महिलांना मिळणाऱ्या असुविधा आणि विश्रांती गृहातील अस्वच्छता यांबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी आमदार प्रविण दरेकर यांनी या चर्चेत भाग घेत म्हटले की, मी एका एसटी कामगाराचा मुलगा आहे. माझी विनंती आहे की, एसटीच्या सर्व विश्रांती गृहांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. बोरिवली, ठुकूरवाडी येथील सर्व विश्रांती गृहांची समिती नेमली. समिती नेमण्यापेक्षा तरतुदीची गरज आहे.
केवळ समित्या, बैठका यापेक्षा आपण निधीची तरतूद करा. तो निधी स्वच्छतांसाठीच असेल. कारण समित्यांचे अहवाल येणार ते तुम्ही पाहणार. नंतर पुन्हा बैठक घेणार. त्यापेक्षा एक ठोस निधी उपलब्ध करून एसटी कर्मचाऱ्यांसाठीच्या विश्रांती गृहांची स्वच्छता राखण्यासाठी तरतूद करत आहोत. त्याची अंमलबजावणी किती कालावधीत होईल याची माहिती द्यावी. कारण विश्रांती गृहात पंखे नाहीत, टॉयलेट नाहीत, महिला सुरक्षेची हमी नाही. त्यामुळे मंत्री महोदयांनी ठोस तरतूद करावी. किती महिन्यांत राज्यातील स्वच्छता गृह चांगल्या पद्धतीची होतील याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी दरेकर यांनी केली.
दरेकर यांच्या मागणीवर बोलताना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले की, ज्यांनी या प्रश्नावर बोलताना आपले विचार मांडले त्यांची बैठक आयोजित करू. त्या बैठकीत सविस्तर चर्चा करून दरेकर यांनी सांगितल्याप्रमाणे देखभाल दुरुस्तीसाठी प्रधान्याने निधी कसा उपलब्ध होईल यावर सकारात्मक विचार बैठकीत केला जाईल.