Post Views : 6
पुणे : ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाची खोटी तक्रार देऊन ती मागे घेण्यासाठी खंडणी उकळल्याच्या प्रकरणात शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अभिनेत्री सारा श्रवण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (३२, रा. सध्या दुबई, मूळ रा. मुंबई) हिला गुन्हे शाखेने मुंबई येथून अटक केली. दरम्यान, रविवारी दुपारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता, तिला न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारत सोडून न जाण्याच्या अटीवर १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अभिनेता सुभाष दत्तात्रय (रा. गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात रोल नंबर १८ चित्रपटाची अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने (रा. दहिटना, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), दहशतवादविरोधी पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे (रा. स्वारगेट पोलिस लाइन) आणि राम भरत जगदाळे (रा. पर्वती पायथा, सहकारनगर) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून सारा श्रवण दुबईमध्ये पळून गेली होती.
अभिनेत्याला खोट्या गुह्यात अडकवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी उपनिरीक्षक अमोल टेकाळे याला निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार २८ सप्टेंबर २०१८ रोजी जगदाळे याच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला होता. पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, पोलिस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयवंत जाधव पुढील तपास करत आहेत.
माफी मागण्यास भाग पाडले
विनयभंगाचा गुन्हा मागे घ्यायचा असल्यास सुभाषने मानेने पाया पडून माफी मागावी व आम्ही त्याचे चित्रीकरण करू, अशी अट घातली. सुभाषने याला नकार दिला. मात्र, त्यानंतर ३ तास सर्वांना जिवे मारू, तोंडावर अॅसिड फेकू व आणखी खोटे गुन्हे दाखल करू, अशा धमक्या देऊन तेथे त्याला व त्याच्या नातेवाइकांना रोहिणी माने हिचे पाय धरून माफी मागण्यास भाग पाडले. त्याचे चित्रीकरण करून एक लाखाची खंडणी उकळली होती. सारा आणि माने मैत्रिणी आहेत. सारा दुबईत वास्तव्यास असल्याने तिला अटक करता आली नव्हती. भारतात आल्यावर तिला अटक करण्यात आली.
संगनमताने दिली तक्रार
रोहिणी माने व यादव यांनी ‘रोल नंबर १८’ या चित्रपटात काम केले आहे. यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यादवला मिळत असलेली प्रसिद्धी माने आणि श्रवणला पाहवत नव्हती तसेच माने ही आपल्याशी लग्न कर यासाठी यादव यांच्या मागे लागली होती. नंतर वानवडी पोलिस ठाण्यात सर्व आरोपींनी संगनमताने यादवविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.
Related News