मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंट असलेली एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट बडनेरा येथील मंगेश चव्हाण नावाच्या तरुणाने केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यावर नवनीत राणा यांच्या समर्थकांनी बडनेरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बडनेरा पोलिसांनी नवनीत राणाची बदनामी करणे, महिलेवर अश्लील व लैगिंक कृत्य करणे, महिलेची इज्जत फुंकणे आदी कलमे लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याशिवाय महिलेच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारी पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर सायबर कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून बडनेरा पोलिसांनी ही पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर कडक कारवाई केली आहे.
नवनीत राणा यांनी शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरेंच्या या समर्थकाने नवनीत राणांविरोधात ही पोस्ट केली आहे. ही पोस्ट आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि अश्लील असल्याची तक्रार नवनीत राणा समर्थकांनी बडनेरा पोलिस ठाण्यात केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ठाकरे कुटुंब आणि राणा कुटुंबात छत्तीसचा आकडा आहे. ठाकरे आणि राणा कुटुंबीय एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तसेच नवनीत राणा यांनी भाजप आमदार नितेश राणेंशी हातमिळवणी करत दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.