Ramiz Raja Sacked: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नजम सेठी (Nazam Sethi) आता खुर्ची सांभाळतील. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी नजम सेठी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांची मालिका पाकिस्तानने गमावली होती. त्यानंतर रमीज राजा यांची खुर्ची जाऊ शकते, अशी चर्चा होती. इंग्लंड मालिकेदरम्यानच माजी बोर्ड सदस्यांच्या नेतृत्वाखालील गटाने रमीझ राजाला पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदावरून हटवण्याची मोहीम सुरू केली होती. पडद्यामागे काही खेळ खेळला जात असल्याचा दावा या गटाने केला. पीसीबीमधील बदलांसाठी देशाच्या कायदा मंत्रालयाने बोर्डाचे संरक्षक पंतप्रधान यांचीही भेट घेतली होती. नजम सेठी बद्दल बोलायचे तर ते जून 2013 ते जानेवारी 2014, फेब्रुवारी 2014 ते मे 2014, ऑगस्ट 2017 ते ऑगस्ट 2018 पर्यंत PCB चे अध्यक्ष होते. त्यांची ही चौथी टर्म असेल.
इम्रान खान यांनी रमीझ राजा यांना केले होते अध्यक्ष
2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाने बहुमत मिळविले तेव्हा नजम सेठी यांनी पीसीबी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पीसीबी बोर्डाच्या घटनेनुसार, अध्यक्षपदासाठी उमेदवारांची नियुक्ती पंतप्रधान करतात. यानंतर, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’ त्यांच्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करते. रमीझ राजाला 2021 मध्ये पीसीबीचे अध्यक्ष बनवण्यात आले. इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ देशाचे पंतप्रधान झाल्यावर रमीझ राजा यांची खुर्ची जाऊ शकते, असे मानले जात होते. मात्र, रमीझने आपली खुर्ची बराच काळ टिकवण्यात यश मिळवले. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघाची खराब कामगिरी आणि अनेक आरोपांनंतर त्याला हटवण्यात आले.
रमीझ राजा आपल्या वक्तव्यामुळे राहिले वादात
काही दिवसांपूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी 2023 च्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याबाबत बोलले होते. भारतीय संघ 2023 आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जय शाह यांनी सांगितले होते. या स्पर्धेसाठी तटस्थ ठिकाण निश्चित केले जाईल. यानंतर रमीझ राजाने पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमधून संघाचे नाव मागे घेण्याची धमकीही दिली. मात्र, लोकांना असेच उत्तर हवे असल्याचे त्यांनी नंतर सांगितले.