—
पालघर-योगेश चांदेकर
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीत धुमशान रंगले असून सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेतही अंतर्गत रस्सीखेच सुरू झाल्याने नवा राजकीय कलगीतुरा जिल्ह्यात रंगला आहे. अध्यक्ष पदासाठी काही जणांनी वैदेही वाढाण यांची वर्णी लावण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे तर बहुतेक निष्ठावंत शिवसेना कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जव्हार तालुक्यातील सेनेच्या सर्वात ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या जिल्हा परिषद सदस्या गुलाब विनायक राऊत अथवा डहाणूतील अमिता घोडा यांची अध्यक्षपदी नियुक्ती करावी,यासाठी विनम्र मागणी केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( यामध्ये एक सदस्य काँग्रेसचा ) नव्याने मान्यता देण्यात आलेल्या सात सदस्यांच्या गटाने देखील गुलाब राऊत किंवा अमिता घोडा यांनाच समर्थन देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी चुरस दिसून येत आहे.
57 सदस्य संख्या असलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. महाविकास आघाडीने सव्वा वर्षाच्या बोलीनुसार अध्यक्ष व अन्य समित्यांच्या पदांची वाटणी केली होती. त्यानुसार भारती कामडी यांचा सव्वा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. याच दरम्यान ओबीसी आरक्षण पध्दतीने निवडून आलेल्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द झाल्याचा फटका बसल्याने महाविकास आघाडीच्या 15 सदस्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनाही सदस्यत्व गमवावे लागले होते.
सद्यस्थितीत 42 सदस्यांमधून अध्यक्ष पदासह इतर समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड 20 जुलै रोजी होणार आहे. शिवसेनेचे सध्या 15 सदस्य आहेत. बहुमतासाठी 22 सदस्यांचा आकडा आवश्यक आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधीना कधीही विश्वासात न घेतल्याने त्यांच्याविरुद्ध स्थानिक स्तरावर प्रचंड असंतोष आहे. त्याचीच परिणाम म्हणून जिल्हा परिषद सदस्यांनी माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे आणि डॉ सुहास संखे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन करून आमदाराच्या मनमानीविरोधात एकजूटपणा निर्माण केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे 15 सदस्य आणि राष्ट्रवादीचा नव्याने स्थापन झालेल्या 7 सदस्यांच्या गटाचा आकडा 22 पर्यंत पोहचल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष व समितीचे सभापती या पदांसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र, काही प्रसारमाध्यमे वैदेही वाढाण यांच्यासाठी आग्रही भूमिका घेत असल्याने शिवसेनेच्या जव्हार तालुक्यातील ज्येष्ठ रणरागिणी गुलाब राऊत यांच्यावर अन्याय होत आल्याचे तळागाळातील शिवसैनिकांना वाटते. तसेच पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिता घोडा या देखील अध्यक्ष पदासाठी वाढाण यांच्यापेक्षा योग्य असल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करत आहेत. वैदेही वाढाण यांच्याऐवजी दोघींपैकी कोणालाही अध्यक्षपद दिल्यास राष्ट्रवादी त्यास समर्थन देईल, असे नव्या गटाने स्पष्ट केले आहे.
*कोण आहेत गुलाब राऊत ?—-*
गुलाब विनायक राऊत ह्या सुमारे 30 वर्षापासुन शिवसेनेत एकनिष्ठपणे काम करत आहेत.
जव्हार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या कासटवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून सलग 15 वर्षे त्यांनी सेनेची भगवी पताका फडकत ठेवली आहे. सलग 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. विशेषतः यावेळी भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हरिश्चंद्र भोये यांच्या पत्नी पंचायत समिती सभापती ज्योती भोये यांचा दणदणीत पराभव करून जिल्हा परिषद गटात विजयाचा गुलाल उधळला होता. त्यांचे पती विनायक राऊत यांनी देखील 5 वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून शिवसेनेचा ठसा उमटवला आहे.
राऊत यांना शिवसेनेच्या सिहांसारख्या नेतृत्वाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपद दिल्यास जव्हार, विक्रमगड, मोखाडा या अति दुर्गम, कुपोषणाचा विळखा असलेल्या भागाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. तसेच त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष वाढीसाठी पोषक वातावरण आदिवासी भागात होईल,असे शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाटते. देशातील सर्वात जास्त कुपोषण असलेल्या या भागातील उमेदवारास अध्यक्ष पद दिल्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर अभिमानास्पद बाब ठरेल.
*अमिता घोडांची पार्श्वभूमी*
—
डहाणू – पालघरचे माजी आमदार कृष्णा घोडा यांची सून आणि पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांच्य त्या पत्नी असून गंजाड गटातून त्या निवडून आल्या आहेत. पालघरचे खासदार कै चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने पालघर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सिटिंग आमदार असलेल्या अमित घोडा यांचा पत्ता कापला होता. त्यामुळे आमदारकीवर पाणी सोडून घोडा यांनी शिवसेनेशी पक्षनिष्ठा जपली होती. त्यामुळे या पक्षनिष्ठपानाचा फायदा अमिता घोडा यांना अध्यक्षपद देण्यास कारणीभूत ठरेल,असाही कयास लावला जातो.
*शरद पवारांचा एकेरी उल्लेख व जिल्हाधिकारी कार्यालयात केलेला राडा आमदार भुसारांना भोवणार*
—–
जिल्हा परिषदेत वेगळा गट स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांशी जिल्हाध्यक्ष आमदार भुसारा यांनी जोरदार राडा केला.शेकडो कार्यकर्त्यांसमोर पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचा एकेरी नामोल्लेख केला. त्यामुळे त्यांना ही धतींगगिरी भोवणार असल्याचे दिसून येते.
*काशीनाथ चौधरी चे मंदा घरट यांना चॅलेंज*
—
जिल्हाधिकारी कार्यालयात राडा सुरू असताना बांधकाम समितीचे माजी सभापती काशीनाथ चौधरी यांनी मोडगाव गटातून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्या मंदा घरट यांना राजीनामा देण्याचे व पुन्हा निवडणूकित 500 मत मिळवण्याचे चॅलेंज दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भुसारा आणि चौधरी यांच्या अपरिपक्व राजकिय राड्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
*राष्ट्रवादीचा नवा गट पक्षाला उभारी देणार ..!*
माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे आणि डॉ सुहास संखे यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर उभारी मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांना आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांची पक्षात हुकूमशाही असून ते कोणालाही विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी कार्यकर्ते करत आहेत. माजी केवळ काशीनाथ चौधरी आणि मोखाडा येथील एका दैनिकाचा प्रतिनिधी यांच्या सल्ल्यानुसार ते अनेक चुकीचे निर्णय घेत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तलासरी, डहाणू, विक्रमगड, वाडा, पालघर, वसई या तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. निलेश सांबरे यांच्यामुळेच विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भुसारा यांना आमदारकीची लॉटरी लागली. त्याच सांबरे यांना संपविण्याचा डाव भुसारा यांच्याकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचे काम नवा गट जोमाने करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.