PCB On BCCI: गुरवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) च्या वतीने एक मोठा निर्णय घेत, रमीझ राजा (Ramiz Raja) यांना पीसीबी प्रमुख पदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी अध्यक्षपदी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही, परंतु एक पॅनेल तयार करण्यात आले जे पुढील चार महिन्यांसाठी पाकिस्तानमधील क्रिकेटचे संचालन करेल. नजम सेठी (Nazam Sethi) यांना या पॅनलचे अध्यक्ष करण्यात आले आहे. म्हणजेच, एक प्रकारे, ते काही दिवसांसाठी अंतरिम पीसीबी प्रमुखाची भूमिका बजावू शकतात परंतु केवळ पॅनेलच्या संमतीने. एका दिवसानंतर गुरुवारी सेठी यांनी पाकिस्तान क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यातील संबंधांबाबत मोठे विधान केले आहे.
भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांवर केले वक्तव्य
2008 च्या आशिया कपपासून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. त्यानंतर 2008 मध्येच, 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, 2009 च्या सुरुवातीला होणारी द्विपक्षीय मालिकाही रद्द करण्यात आली होती. पाकिस्तानने सहा सामन्यांच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी 2012 मध्ये भारताचा शेवटचा दौरा केला होता, परंतु त्यानंतर गेल्या 10 वर्षांत दोघांमध्ये कोणतेही द्विपक्षीय क्रिकेट खेळले गेले नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांना भेटतात. सेठी यांनी 2013 ते 2018 दरम्यान बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. पण 2018 मध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. आता त्यांनी भारतासोबतच्या क्रिकेट संबंधांवर वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले नजम सेठी?
लाहोरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना नजम सेठी म्हणाले, “जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय आणि इतर क्रिकेट संबंधांचा विचार केला जातो तेव्हा दोन्ही देशांच्या सरकारांशी सल्लामसलत केली जाईल.” याशिवाय, त्यांनी न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानच्या टेस्ट टीमच्या घोषणेवरही त्यांनी वक्तव्य केलं. या संघाच्या निवडीवर सेठी खूश नव्हते. संघात बदलांची गरज आहे की नाही हे मला माहीत नाही, नवीन कल्पनांची गरज आहे की नाही ते पाहू, असे ते म्हणाले. संघ जाहीर केला नसता तर बरे झाले असते.