प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घोषणा; जिल्हास्तरीय मित्रपक्ष संमेलन
भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश
पालघर-योगेश चांदेकर
पालघरः भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात समन्वय असावा, यासाठी महायुती मित्रपक्ष संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खा. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या १२ जिल्ह्यासाठी समन्वयक नियुक्तीची घोषणा केली आहे. त्यात पालघर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून माजी आमदार आनंद ठाकूर यांची नियुक्ती केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तीनही मित्रपक्षांत समन्वय राहावा, जिल्ह्यांत कार्यक्रमांची अंमलबजावणी करताना त्यांना विश्वासात घेतले जावे, यासाठी समन्वयकांवर मोठी जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने यासाठी ठाकूर यांची निवड केली आहे. माजी आमदार राहिलेल्या ठाकूर यांच्या अनुभवाचा वापर पक्ष करून घेत आहे. त्यांचे सर्वांशी असलेले मित्रत्त्वाचे संबंध आता उपयोगी ठरतील. विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांच्या नेतृत्त्वाचा उपयोग करून घेतला जाईल.
तटकरे यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, आनंद ठाकूर यांच्यावर पालघर, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर ठाणे, आ. अनिल तटकरे यांच्यावर रायगड, आ. शेखर निकम यांच्यावर रत्नागिरी, जिल्हाध्यक्ष आबिद नाईक यांच्यावर सिंधुदुर्ग, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्यावर पुणे, आ. मकरंद जाधव यांच्यावर सातारा, जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्यावर सांगली, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर कोल्हापूर, तर आ. यशवंत माने यांच्यावर सोलापूरची समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे