वेब टीम : मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कधीच म्हटले नाही, असे सांगत कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीला लागण्याचा संदेशही पक्षाध्यक्षांकडून देण्यात आल्याचा दावा मनसेचे प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सोमवारी केला.
मनसेची राज्यातील २८८ मतदारसंघांत विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू असल्याचे सांगत मनसे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट करीत अंतिमत: किती जागा लढवायच्या, याबाबतचा निर्णय खुद्द पक्षाध्यक्षच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर आली असतानाही मनसेच्या गोटात शातंतता पसरली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीसंदर्भात स्पष्ट भूमिका जाहीर होत नसल्याने राज्यासह नाशिकमधील कार्यकर्तेही सैरभैर झाले होते. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट धरल्याची चर्चा होती.
या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे यांनी सोमवारी नाशिकमध्ये येऊन पक्षाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांसोबतही देशपांडे आणि पानसे यांनी चर्चा केली. पत्रकारांशी बोलताना मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा संदेश राज ठाकरेंनी दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी फलकासंदर्भात ‘ईडी’ने उत्तर द्यावे ही अपेक्षा आहे. परंतु, उत्तर दिले नाही, तर ‘ईडी’ला ‘कृष्णकुंज’वर येऊन उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.