नागपूर: पंढरपूर हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. तेथील विकासाला आडकाठी येता कामा नये. ऐतिहासिक पुरातन, धार्मिक या सर्व गोष्टीचे अवलोकन करावे आणि वाराणसीच्या धर्तीवर दर्जेदार असा विकास पंढरपूरचा झाला पाहिजे, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर हा भक्तीचा विषय आहे. त्यामुळे कुणावरही अन्याय न करता तेथील लोकांना विश्वासात घेऊन त्यांचा मोबदला, पुनर्वसन करून, सोयी सुविधा न देता असा कुठलाही प्रकल्प रेटणार नाही, असे सकारात्मक उत्तर दिले.
विधानपरिषदेत आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंढरपूर कोरिडोरबाबत लक्षवेधी मांडली. यावेळी चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर म्हणाले की, वाराणसीचा जर विकास होत असेल तर त्या धर्तीवर आपले पंढरपूर तीर्थक्षेत्र देशातून नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून लोकं तिथे दर्शनाला येतील. पर्यटनाच्या दृष्टीने वाढ होईल. मी गेल्या महिन्यात महाकालला गेलो होतो. ज्या प्रमाणे तेथे कोरिडोर विकसित केले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले होते. जर आपले पंढरपूर विकसित होण्याच्या मार्गांवर येत असेल तर ज्या अडचणी आहेत त्या दूर झाल्याच पाहिजेत. विकासाला आडकाठी न येता वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा दर्जेदार विकास झाला पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंढरपूरला आषाढीला लाखो भाविक जात असतात. पंढरपूर हे गोरगरीब, वारकऱ्यांचे तीर्थस्थान आहे. तेथील सोयी सुविधा, स्वच्छता, रस्तेही चांगल्या स्थितीत असले पाहिजेत. दरवर्षी कार्तिकीला मोबाईल शौचालय ठेवली जातात. ही कायमस्वरूपी व्यवस्था असली पाहिजे पंढरपूर हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. म्हणूनच पंढरपूरचा विकास आराखडा बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये काँक्रिटचे रस्ते, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था इतरही सुविधा या सर्वच बाबी असल्या पाहिजेत. जुने पुरातन वाडे, मठ आहेत. तेथे व्यवसाय करणारे छोटे व्यापारी आहेत. परंतु एका मोठ्या प्रकल्पमुळे लाखो लोकांचा फायदा होणार आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाने सहकार्य करायला हवे.
तेथील लोकांवर अन्याय होता कामा नये, त्यांना विश्वासात घ्या, त्यांचे काय म्हणणे आहे बघा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विकास होताना स्थानिक लोकांवर कुठलाही अन्याय करून आम्ही विकास करणार नाही. बाळासाहेबांची ही शिकवण आहे. हा प्रकल्प लाखो लोकांसाठी महत्वाचा आहे. तेथील स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांचा मोबदला, पुनर्वसन, सोयी सुविधा न देता असा कुठलाही प्रकल्प रेटणार नाही. कुणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.