banner 728x90

विधानसभाध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले, भाजपानेही मैदानात उतरवला उमेदवार

banner 468x60

Share This:
मुंबई : विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचं नाव निश्चित करण्यासाठी लवकरच ते अर्ज दाखल करतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसंच उपमुख्यमंत्रीपदावरुन कोणताही वाद नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. दुसरीकडे भाजपाकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
महाविकासआघाडीच्या चर्चेत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला होता. यात बदल करून उपमुख्यमंत्रीपद मिळावे, असा आग्रह काँग्रेसकडून शुक्रवारी धरण्यात आला. पण राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळून लावली. तरीही काँग्रेसचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरूच होते. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तरीही सत्तावाटपाचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. आघाडीच्या बुधवारी रात्री झालेल्या चर्चेत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला, असा निर्णय झाला होता. या बदल्यात राष्ट्रवादीला एक अतिरिक्त मंत्रिपद मिळणार होते.
शपथविधीच्या दिवशी मात्र काँग्रेसने या निर्णयात बदल करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला तर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने सादर केला. मात्र, राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळून लावली होती. शुक्रवारी पुन्हा काँग्रेसने नव्याने प्रयत्न सुरू केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीने विधानसभा अध्यक्षपद घ्यावे. या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळावे, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावर दावा केला असला, तरी आधी तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत झालेला निर्णय आता बदलणार कसा, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. काँग्रेसची बदल करण्याची मागणी मान्य करता येणार नाही, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचा हट्ट का?
अस्थिर राजकीय परिस्थितीत आमदारांची फोडाफोड होण्याची शक्यता आहे. अशा वेळी विधानसभा अध्यक्षपद आपल्याकडे असावे, असा काँग्रेसचा प्रयत्न होता. विधानसभा अध्यक्षाऐवजी उपमुख्यमंत्रीपद हे राजकीयदृष्टय़ा फायद्याचे असल्याचा सूर काँग्रेसमध्ये उमटला. कारण सरकारी जाहीराती किंवा साऱ्या समारंभांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रसिद्धी मिळते. हे सरकार शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच आहे, असा संदेश जाऊ शकतो. यातूनच विधानसभा अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद मिळावे, असा प्रस्ताव काँग्रेसने मांडला. पण राष्ट्रवादीने आता बदल करण्यास नकार दिला. राष्ट्रवादीची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादीला अतिरिक्त मंत्रिपद देण्याच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद मिळावे, असा काँग्रेसचा प्रयत्न होता.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!