वसई तालुक्यातील थल्याचा पाडा येथील कोरोनाबधित गंभीर रुग्ण बारक्या कातकरी याचा “तातडीने उपचार व्हाया श्रमजीवी कोविड सेंटर उसगाव टू स्टार हॉस्पिटल नालासोपारा” हा जो काही प्रवास झाला हा विवेक भाऊ पंडित या अत्यंत संवेदनशील आणि मातृहृदयी माणसाच्या धडपडीमुळेच यशस्वी झाला. अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या या गरीब दुबळ्या कातकरी समाजातील 85 वर्षीय वृद्धाला कोरोनाच्या चक्रव्यूहातुन बाहेर काढण्याचे उल्लेखनीय काम विवेक पंडित यांच्यामुळे स्टार हॉस्पिटल नालासोपाराचे डॉक्टर महाबली सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. कोरोनाच्या या लढाईत “अखेर बारक्या जिंकला”.
20 दिवसांपूर्वी उसगाव येथील श्रमजीवी कोविड केअर सेंटरमध्ये बारक्या पवार या 85 वर्षीय वृद्धाला अत्यंत गंभीर अवस्थेत त्याची मुलगी घेऊन आली. बारक्या पवार हे उसगाव शिबिर शाळेतील एक विद्यार्थिनी पूजा पवार हिचे आजोबा. येथील स्टाफ ने तातडीने तपासणी केली, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या बारक्या पवार यांची ब्लड ऑक्सिजन पातळी अत्यंत खालावलेली होती. 70 ते 75 ब्लड ऑक्सिजन असलेल्या बारक्याला या कोविड केअर सेंटर मध्ये ठेवणे अवघड होते, मात्र योगायोगाने रुग्ण तपासणीसाठी आलेले डॉ.विनय पाटील यांनी तातडीने बारक्या पवार या रुग्णाला कोविड सेंटर मध्ये घेऊन त्याला प्राथमिक उपचार आणि ऑक्सिजन सुरू केला. त्याला स्टेबल करण्याचा प्रयत्न करत असतानाच कोविड सेंटरमध्ये असलेले प्रा.दिनेश काटले यांनी तातडीने विवेक पंडित यांच्यासोबत संपर्क केला, आणि बारक्या बद्दल संगीतले. क्षणाचाही विलंब न लावता कार्डिओलॉजिस्ट असलेल्या डॉ.महाबली सिंग यांना पंडित यांनी संपर्क साधला. रुग्ण बारक्याच्या मेडिकल स्टेटस बाबत त्यांना ज्ञात करतानाच बारक्या हा अत्यंत गरीब आणि कातकरी आदिम कुटुंबातील सामान्य माणूस आहे याचीही माहिती दिली. विवेक पंडित यांचा शब्द,तो पडेल असे होईलच कसे? लागलीच डॉ.महाबली सिंग यांनी बारक्याला आपल्या नालासोपारा स्थित स्टार हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास सांगितले. लगेच सूत्र हलली. उसगाव येथून बारक्या पवार यांना नेण्यासाठी मिलींद कांबळे यांनी तातडीने ऑक्सिजन सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आणि बारक्या अवघ्या काही वेळातच स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.
त्या दिवशी ज्यांनी ज्यांनी बारक्या पवार यांना पाहिले असेल त्यांना खात्रीने वाटले होते की बारक्या पवार आता वाचणार नाही, कोरोनाच्या या संकटात इतक्या गंभीर स्थितीत हा गरीब सामान्य माणूस ज्याच्या खिशात साधी दहा रुपयाचीही नोट नाही असा माणूस वाचेल असा विश्वास तरी कोण ठेवणार? पण ते शक्य झाले. तब्बल 20 दिवस बारक्या पवार याने स्टार हॉस्पिटलमध्ये कोरोनाशी कडवी झुंज दिली. दिवसातून किमान दोन वेळा विवेक पंडित बारक्या बाबत विचारपूस करायचे, त्याला आवश्यक असणारा उत्तमोत्तम उपचार देण्यासाठी डॉ.महाबली सिंग आणि त्यांची टीम धडपडत होती. अखेर 5 जून हा दिवस उजाडला तो बारक्यासाठी नवे जीवन घेऊनच. बारक्याचा डिस्चार्ज आहे असा संदेश मिळताच विवेक पंडित आपले कार्यकर्ते प्रमोद पवार, ममता परेड यांना सोबत घेत स्वतः स्टार हॉस्पिटलमध्ये पोहचले. सर्वप्रथम पंडित यांनी डॉ.महाबली सिंग यांची भेट घेऊन त्यांचे शतशः आभार मानले, त्यांना श्री विठू माऊलीची मूर्ती भेट देत बारक्या पवार साठी तुम्ही श्री विठ्ठलासारखे धावून आल्याचे गौरवोद्गार पंडित यांनी डॉ.महाबली यांच्यासाठी काढले.
बारक्याला जसे बाहेर आणले आणि विवेक पंडित त्याच्या समोर आले बरक्याचे डोळे पाणावले. “भाऊ तुम्ही नसतं त मी जगलू नसतू”या एका सध्या सरळ वाक्यात निरागस बरक्याचे विवेक पंडित यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
डिस्चार्ज मिळाल्यावर घरी न जाता बारक्या उसगावला आला, “ही गाडी आमचे हाफीस ला मारा” (गाडी संघटना ऑफिस कडे वळवा) असे तो चालकाला सांगत होता. इथे येऊन सगळ्यांना धन्यवाद देत जिंकलेला सावळ्या धीरोदत्तपणे घराकडे परतला.
बारक्या पवारच्या बरे होण्याचे श्रेय माझे अजिबात नाही,मी केवळ एक निमित्त आहे यात डॉ.महाबली सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सिहांचा वाटा आहे, एकही नया पैसा न घेता या हॉस्पिटलमध्ये बरक्याचे उपचार करून याला ठणठणीत करून घरी पाठवणे म्हणजे दिव्य होते ते स्टार हॉस्पिटलने शक्य केले. तर तातडीने प्राथमिक उपचार देणारे डॉ.विनय आणि डॉ.वर्षा पाटील, डॉ.चिन्मयी, डॉ.रफत,डॉ.आसिफ,डॉ.सुखदा, डॉ.मयूर आणि सर्व स्टाफ तसेच प्रा.दिनेश काटले, मिलिंद कांबळे इत्यादी सगळ्यांचे हातभार लागल्याने बारक्या जिंकू शकला असे या निमित्ताने विवेक पंडित म्हणाले.