पालघर – योगेश चांदेकर
डहाणू: शिक्षक सेवा शर्तीच्या नियमांसह ‘आरएनआय’च्या नियमांनाही तिलांजली देत डिजिटल दैनिक चालवत संपादकपदाचे भूषण मिरविणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक शाहू भारती यांनी प्रशासनाच्या संभाव्य कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. याचाच प्रत्यय म्हणून एका संस्थेने पत्रकारितेसाठी जाहीर केलेला पुरस्कार स्वीकारण्यापासून त्यांनी आता मात्र ‘पळ’ काढल्याचे समोर आले आहे.
डहाणू पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुरबाड मुरबीपाडा या शाळेत शाहू भारती उपशिक्षकपदी कार्यरत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या संहितेचे उल्लंघन करून जवळपास चार वर्षांपासून त्यांनी रयतेचा कैवारी हे डिजिटल दैनिक प्रकाशित केले. विशेष म्हणजे या दैनिकाची त्यांनी ‘आरएनआय’कडे नोंदणीही केली नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर भर देण्याऐवजी त्यांनी चालविलेल्या अनधिकृत पत्रकारितेच्या कार्याबद्दल एका खासगी संस्थेने त्यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला होता. या संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये वृत्तही प्रकाशित झाले होते. मात्र, अध्यापन कार्याऐवजी पत्रकारितेची ‘शाळा’ चालवण्याचा भारती यांचा ‘प्रताप’ डिजिटल दैनिक ‘लक्षवेधी’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर शिक्षण विभाग आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी कायदेशीर कार्यवाहीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
शाहू भारती यांना एका संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी
यासोबतच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनीही कठोर पाऊले उचलण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे संभाव्य प्रशासकीय कार्यवाहीचा भारती यांनी चांगलाच धसका घेतला आहे. संबंधित संस्थेला त्यांनी आपण आता पुरस्कार स्वीकारण्यास उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळविले आहे.दरम्यान, संबंधित संस्थेने शाहू भारती यांचे डिजिटल दैनिकाच्या अनधिकृतपणाची माहिती नसल्याचे, तसेच या प्रकाराची कल्पना नसल्याचे ‘लक्षवेधी’ला सांगितले आहे.
अनधिकृत पत्रकारितेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब
प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर शाहू भारती यांनी त्यांचे दैनिक अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले. या माध्यमातून त्यांनी या प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. त्या पाठोपाठ आता पुरस्कार स्वीकारण्यापासून माघार घेत त्यांनी आपल्या अनधिकृत पत्रकारितेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याचे दिसून आले आहे.