banner 728x90

शिक्षक संपादक भारती प्रकरणी प्रशासन ‘अँक्शन मोड’मध्ये, उपविभागीय अधिकाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश

banner 468x60

Share This:


पालघर – योगेश चांदेकर

पालघर: जिल्हा परिषदेचे शिक्षक असतानाही अनधिकृतरित्या डिजिटल दैनिक चालवत संपादक बनलेल्या शाहू भारती यांच्या ‘प्रतापाची’ दखल घेऊन उपविभागीय अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. याच दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनीही कठोर पाऊले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

banner 325x300

पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत डहाणू पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुरबाड मुरबीपाडा शाळेत शाहू भारती उपशिक्षकपदी कार्यरत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या संहितेचे उल्लंघन करून जवळपास चार वर्षांपासून ते रयतेचा कैवारी नावाचे डिजिटल दैनिक प्रकाशित करत आहेत. या संदर्भात डिजिटल दैनिक ‘लक्षवेधी’ने दि. 20 डिसेंबरला पर्दाफाश केल्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने त्यांना नोटीस बजावत दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी खुलासा दिला असल्याची माहिती आहे.

आपण या डिजिटल दैनिकासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे भारती यांनी खुलाशात नमूद केल्याची माहिती आहे. या खुलाशानंतर शिक्षण विभागाकडून आता पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. याच दरम्यान भारती यांनी उपशिक्षकपदी कार्यरत असताना तसेच ‘आरएनआय’कडे नोंदणी न करताच डिजिटल दैनिक चालविल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी संजीता महोपात्र यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी, तसेच अहवाल सादर करावा, असे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षही आक्रमक 

शाहू भारती यांच्या अनधिकृत पत्रकारितेची दखल घेऊन प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनीही गांभीर्याने दखल घेतली आहे. शाहू भारती यांच्यावर कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, भारती यांच्या प्रकरणाच्या अनुषंगाने निकम यांनी शिक्षकांच्या एका बैठकीत, शिक्षकांना आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर भर देण्यास सांगून अध्यापनकार्याऐवजी अवांतर व्यवसाय न करण्याचीही सूचना केली आहे.

आधी म्हणाले शैक्षणिक दैनिक, आता मात्र ‘शट डाऊन’

आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांसाठी काळजीपूर्वक अध्यापनकार्य करण्याऐवजी ‘रयतेचा कैवारी’ होत संपादकपदाचे भूषण मिरविणाऱ्या शाहू भारती यांनी आता अनिश्‍चित काळासाठी डिजिटल दैनिक बंद केले आहे. आपल्या दैनिकाचा प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाशी संबंध नसून तो सोशल मीडियाचा भाग असल्याची पोस्ट भारती यांनी आधी व्हायरल केली होती. मात्र, आता प्रशासनाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्याने भारती यांनी त्यांचे दैनिक अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. अशाप्रकारे या प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाल्याच्या बाबीवर भारती यांनीही एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते करणार ‘आरएनआय’कडे तक्रार

अध्यापनकार्याऐवजी पत्रकारिता करणाऱ्या शाहू भारती यांनी दैनिकांची नोंदणी न केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी तसेच ‘आरएनआय’कडे तक्रार करण्याचे संकेत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले आहेत. या प्रकरणी भारती यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.

चार वर्षे प्रशासन झोपेतच!

शाहू भारती जवळपास चार वर्षांपासून  ‘पत्रकारितेची शाळा’ चालवत असतानाही प्रशासनाचे लक्ष कसे गेले नाही,  याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणात भारती यांना एकतर अधिकाऱ्यांचा वरदहस्त असावा किंवा राजकीय दबावामुळे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असावे असा संशय  व्यक्त होत आहे‌. आता डिजिटल दैनिक ‘लक्षवेधी’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत निद्रिस्त राहिलेल्या प्रशासनाने आतातरी केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात आणखी किती शिक्षकांच्या ‘शाळा’?

आदिवासीबहुल भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकपट विकासासाठी  झटण्याऐवजी पत्रकारितेची शाळा चालविणाऱ्या शाहू भारती यांचे हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आणखी किती शिक्षक अध्यापनाऐवजी इतर प्रकारच्या ‘शाळा’ चालवत आहेत, याचीही प्रशासनाने पडताळणी करावी, अशी अपेक्षा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!