पालघर-योगेश चांदेकर
डहाणू: सेवा शर्तीचे नियम धाब्यावर पायदळी तुडवत आणि ‘आरएनआय’कडे नोंदणी न करताच डिजिटल दैनिक चालवत संपादक बनलेले शिक्षक शाहू संभाजी भारती यांच्या ‘प्रतापाची’शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. अनधिकृतरित्या दैनिक चालविल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, शिस्तभंगाच्या कारवाईसाठी पाऊल उचलले आहे. याच दरम्यान, दैनिकाची नोंदणी न केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनीही कारवाईचे संकेत दिले आहेत. डहाणू पंचायत समिती अंतर्गत मुरबाड मुरबीपाडा या शाळेत शाहू भारती उपशिक्षकपदी कार्यरत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या संहितेचे उघडपणे उल्लंघन करून ते रयतेचा कैवारी नावाने जवळपास चार वर्षांपासून डिजिटल दैनिक प्रकाशित करत आहेत. या संदर्भात डिजिटल दैनिक ‘लक्षवेधी’ने मंगळवारी, दि. 20 डिसेंबरला पर्दाफाश केला होता. त्याची तातडीने दखल घेऊन डहाणू पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शाहू भारती यांना नोटीस बजावली आहे.
चार वर्षांपासून रयतेचा कैवारी हे डिजिटल चालवून राज्यातील अनेक जिल्ह्यांत प्रतिनिधी नियुक्ती केल्याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. डिजिटल दैनिक चालवत असल्याने एका खासगी संस्थेमार्फत पत्रकारीतेतील जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याचा मुद्दाही नोटीसद्वारे नमूद करण्यात आला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 चा नियम 14 अन्वये कोणताही जिल्हा परिषद कर्मचारी नियुक्ती प्राधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पूर्वमंजुरीने किंवा त्याखेरीज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खासगी काम सुरू करू शकत नाही, असेही या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या दैनिकाबाबत नियुक्ती प्राधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतली आहे की नाही? तसेच या डिजिटल दैनिकाची आरएनआयकडे नोंदणी केली की नाही?, अशी विचारणाही शिक्षण विभागाने भारती यांना केली आहे. यासोबतच डिजिटल दैनिक प्रकाशनामुळे शालेय कामास बाधा येत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ?, असा ठपकाही शिक्षण विभागाने भारती यांच्यावर ठेवला आहे ?
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, 1964 चा नियम 7 नुसार आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा दोन दिवसांत सादर करावा, असे निर्देश शिक्षण विभागाने भारती यांना दिले आहेत. खुलासा संयुक्तिक आणि मुदतीत प्राप्त न झाल्यास तुम्हाला याबाबत काही सांगावयाचे नाही असे समजून एकतर्फी कारवाई सुरू करण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने भारती यांना ठणकावले आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांकडूनही दखल
शिक्षण क्षेत्राऐवजी पत्रकारितेची ‘शाळा’ चालवणारे संपादक शिक्षक शाहू भारती यांनी डिजिटल दैनिकाची ‘आरएनआय’कडे नोंदणी न केल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनीही दखल घेतली आहे. आपण या प्रकरणाची माहिती घेणार असून, नियमानुसार कारवाई करू, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी दिली आहे.
पंचायत समितीच्या सभापतींकडूनही दखल
शाहू भारती यांच्या ‘कारभारा’ची दखल डहाणू पंचायत समितीचे सभापती प्रवीण गवळी यांनीही घेतली आहे. घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन निश्चितच कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.