वेब टीम : संगमनेर
देशातील वाहन, वस्त्रोद्योगात मंदी आली आहे. तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरीही नाडला गेला आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. सरकारने भरमसाठ खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
दरम्यान ना. विखे पाटिल यांच्यावर सडकून टिका केली, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 52 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, अजय फटांगरे, आर. एम. कातोरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या 12 शेतकऱ्यांचा आ. थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माझ्यावर सध्या कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यानिमित्तानं मी राज्यभर दौरे करीत आहे.
ज्या कॉंग्रेस पक्षाने मला ताकद दिली, मान सन्मानाची पदे दिली, त्या पक्षाला अडचणीच्या काळात सोडून मी पळून गेलो नाही, तर ठामपणे उभा राहिलो, असं सांगताना मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असल्याचे आ. थोरात यांनी अभिमानाने सांगितले.निळवंडेसाठी काय केले, या गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रश्नावर ते म्हणाले, 1992 पासून 1999 पर्यंत निळवंडेच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. 1999 ला पाटबंधारेमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निळवंडेच्या कामाला सुरुवात झाली.
बारा वर्षांत धरणाचे काम पूर्णत्वाला गेले. मोठ्या कामाला वेळ लागतो. पुनर्वसनासाठी स्वतःची पाच एकर जमीन दिली. सध्या 30 ते 40 टक्के काम बाकी आहे. चार वर्षांत त्यांनी काहीच दिले नाही. आता शंभर कोटी रुपये आलेत. बाराशे कोटी रुपयांचा फक्त प्रस्ताव आहे. निळवंडेचे काम मीच पूर्ण करणार आहे. फक्त हे काम करण्यासाठी तुम्ही मला ताकद दिली पाहिजे. दुष्काळी भागातील लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन काही मंडळी त्यांच्या मनामध्ये विष कलवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही ते म्हणाले.