मुंबईत दादर येथील टोरेस कंपनीबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे. कंपनीनं दिलेल्या आश्वासनानुसार हप्ते मिळत नसल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी केली आहे. कंपनीच्या योजनेत अनेकांनी लाखो रुपये गुंतवल्याची माहिती समोर आली आहे.
सुरुवातीला कंनपीकडून काही हप्ते देण्यात आले पण गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे.
टोरेस कंपनीच्या दादर येथील कार्यालयाबाहेर गर्दी झाल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस देखील दाखल झाले आहेत. सध्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त असून कोणतीच माहिती आम्हाला दिली जात नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. दरम्यान, मुंबईसह नवी मुंबई, मिराभाईंदर येथेही टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेरही गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे. नवी मुंबईच्या कार्यालयावर तर गुंतवणूकदरांनी दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला आहे.
गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार असल्याचं आश्वासन कंपनीकडून देण्यात आलं होतं. गेल्या वर्षभरापासून ही कंपनी मुंबईत विविध ठिकाणी कार्यरत आहे आणि डिसेंबर महिन्यापर्यंत गुंतवणूकदारांना हप्ते मिळत होते. पण गेल्या दोन आठवड्यांपासून हप्ते मिळत नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे.
आम्हाला तुमचं व्याज नको. पण आम्ही गुंतवलेले पैसे तेवढे परत करा अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत. कंपनीमध्ये नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीकडून कोणतीच माहिती देण्यात येत नसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. कंपनीचा मालक परदेशात वास्तव्याला असल्याचं सांगण्यात येत आहे.