पालघर-योगेश चांदेकर
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांची कारवाई
पालघरःराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर व डहाणू येथील भरारी पथकांनी मोखाडा तालुक्यातील नीळमाती येथे कारवाई करून विदेशी मद्य, बियरचा साठा व वाहन असा मिळून १३ लाख ८३ हजार ३२० रुपयांचा ऐवज जप्त केला. नाशिक-जव्हार रस्त्यावर मोखाडा तालुक्यात ही कारवाई करण्यात आली.
अवैध मद्य वाहतूक प्रकरणी आत्ता पर्यंत वर्षभरात अनेक कारवाया राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने ही धडक कारवाई केली आहे. पालघर तसेच डहाणू येथील संयुक्त पथकांनी सापळा रचून नीळमाती (ता.मोखाडा) येथे विदेशी मद्य आणि बिअर जप्त केले आहे.
जळगावला नेले जात होते मद्य
हे मद्य दादरा-नगर हवेली, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील होते. महिंद्रा कंपनीच्या बोलेरो टेम्पो क्रमांक (एम पी ४६ जी २५९६) या टेम्पोतून हे मद्य नेले जात होते. ते जळगावकडे नेले जात असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ते टेम्पोचालक प्रवीण नथू पाटील (अमळनेर, जि. जळगाव), गणेश बाबुराव पवार (उधना तालुका, जि. सुरत) यांना ताब्यात घेण्यात आले असून मद्यसाठा मालक धीरज चतुर पाटील हा मात्र फरार झाला आहे.
यांनी केली कारवाई
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार अंमलबजावणी व दक्षता पथकाचे संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, उपाधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघरचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, डहाणू विभागाचे निरीक्षक एस. एस. देशमुख, भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक उदय शिंदे, दुय्यम निरीक्षक पांडुरंग पडवळ, जवान अमोल नलावडे, योगेश हरपाले, वाहन चालक महेंद्र पाडवी व वाहन चालक अनिल पाटील आदींनी ही कारवाई केली.