Rules Changing From 1st January 2025: नवीन वर्ष अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे. मात्र, नवीन वर्षासोबतच तुमच्या आर्थिक खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2025 पासून अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहे.
एलजीजी सिलेंडरच्या किंमतीपासून ते यूपीआयपर्यंत अनेक मोठे बदल नवीन वर्षात पाहायला मिळतील. या निर्णयामुळे तुमच्या खिश्यावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2025 पासून लागू होणाऱ्या अशाच 5 निर्णयांबाबत जाणून घेऊया.
एलपीजीच्या किंमतीत होणार बदल
गेल्याकाही महिन्यांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. कंपन्यांकडून दरमहिन्याच्या 1 तारखेला याबाबत पुनरावलोकन केले जाते. 1 जानेवारी 2025 नंतर कंपन्यांकडून सिलेंडरच्या किंमतीत बदल केले जाऊ शकतात. याशिवाय, इंधनाच्या किंमतीत बदल पाहायला मिळू शकतील
EPFO च्या नियमात होणार बदल
1 जानेवारी 2025 पासून कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच EPFO द्वारे पेन्शनधारकांसाठीच्या नियमात बदल केला जाईल. नवीन नियमामुळे आता पेन्शनधारकांना पेन्शनची रक्कम देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून काढता येणार आहे. यासाठी कोणत्याही अतिरिक्त व्हेरिफिकेशन प्रक्रियेची गरज नसेल. या नवीन नियमाचा लाखो पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
कारच्या किंमतीत वाढ
नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुमच्या खिश्यावर अतिरिक्त भार पडू शकतो. देशातील अनेक ऑटोमोबाइल कंपन्यांनी वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केलेली आहे. कारच्या किंमतीत 1 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. उत्पादन खर्चातील वाढ हे यामागचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंडाईसह इतर प्रमुख कंपन्यांच्या कारच्या किंमती वाढणार आहेत.
UPI 123Pay साठी नवीन नियम
आरबीआयद्वारे फीचर फोन वापरणाऱ्या यूजर्ससाठी UPI 123Pay ही ऑनलाइन पेमेंट प्रणाली सुरुवात करण्यात आली होती. याद्वारे आतापर्यंत 5 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करण्याची सुविधा होती. मात्र, आता रक्कमेची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून UPI 123Pay द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटची मर्यादा 10 हजार रुपये असेल. याचा सर्वाधिक फायदा फीचर फोन वापरणाऱ्या यूजर्सला होणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांशी संबंधित नियमात देखील बदल पाहायला मिळणार आहे. याआधी शेतकऱ्यांना 1.6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तारणमुक्त दिले जात असे. या रक्कमेत आरबीआयकडून वाढ करण्यात आली आहे. 1 जानेवारीपासून 2025 पासून आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत तारणमुक्त कर्ज मिळणार आहे.