अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने गेले दोन ते तीन दिवस राज्याला मान्सूनचा तडाखा बसत आहे. मुंबई कोकण किनारपट्टीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सातत्याने पावसाचा मारा सुरु असल्याने शहरातील सखल भागात रात्रीपासून पाणी साचले आहे.
मुंबईत 20 आणि 21 तारखेला अतिमुसळधार पावसाचा इशारा वेध शाळेने दिला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्यांना धोकादायक पातळी ओलांडली आहे. मुंबईत रात्रीपासून सलग पाऊस कोसळत आहे.20 जुलै रोजी रात्री समुद्रात रात्री नऊ वाजताच्या दरम्यान भरती असल्याने समुद्र किनाऱ्यावर आठ ते दहा फूटांच्या लाटा उसळ्याचा अंदाज आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्राच्या भरती वेळी मुंबईतील ब्रिटीशकालीन पर्जन्यवाहीन्यांची झाकणे बंद केली जातात. कारण समुद्राचे पाणी उलटे शहरात येते. त्यामुळे जर या काळात मोठी पर्जन्यवृष्टी झाली तर मुंबई बुडते हे दरवर्षीचे गणित आहे.
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा 21 ते 22 जुलैनंतर कमी होत जाणार आहे. तरीही त्याचा प्रभाव 25 ते 26 जुलै पर्यंत राहणार आहे. त्यामुळे आणखी 4 ते 5 दिवस पाऊसाचा मुक्काम राहणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत जुलै महिन्याची सरासरी ओलांडून नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. मरिन ड्राईव्ह, वरळी सी फेस,वरळी कोळीवाडा, माहिम – दादर चौपाटी, तसेच आजूबाजूच्या परिसरातील येथील अनेक चौपाट्यांवरील घरांतघरात लाटांच्या धडकांनी पाणी गेले आहे. मुंबईतील अंधेरी मिलन सबवे, कुर्ला नाला, मिठी नदी तसेच सखल भागात पाणी साचले आहे.