banner 728x90

महाराष्ट्राचा चाणक्य : योगेश चांदेकर यांच्या लेखणीतून विशेष संपादकीय.

banner 468x60

Share This:

banner 325x300

गेल्या दहा वर्षांपासून मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाची सारी सूत्रं देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहेत. महाराष्ट्रातील चाणक्य, मुत्सद्देगिरीत पवार यांच्यावरही मात करणारा नेता आणि सावज टप्प्यात आलं, की अचूक शिकार करणारा शिकारी अशी आता त्यांची ओळख आहे. सामाजिक कामात अनेकदा आमच्या पाठिशी राहिलेल्या या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा!

देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे उठून दिसणारं नाव. गेल्या तीन दशकापासून अधिक काळ ते सक्रिय राजकारणात आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते, एकेकाळी मॉडेल म्हणून काम केलेले फडणवीस हे गेल्या काही दिवसाच्या राजकीय नाट्याचे सूत्रधार झाले आहेत. त्यांच्या घरात जनसंघाचं वातावरण होतं. त्यांच्यावर राजकीय संस्कार इतके खोलवर रुजले होते, की त्यांच्या शाळेच्या नावात इंदिरा होतं म्हणून त्यांनी ती शाळा बदलली. १९९२ मध्ये ते नागपूर महापालिकेत २२व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक झाले. इतक्या कमी वयात नगरसेवक होणारे तेव्हा ते पहिलेच होते.तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांचा राजकारणातला प्रवेश हा इतर राजकारण्यांच्या तुलनेत सोपा होता; मात्र राजकारणातली आजवरची वाटचाल ही कष्टसाध्य आहे. एकदा अटलबिहारी वाजपेयी यांनी फडणवीस यांना बोलावलं. त्यांना त्याचं खूप टेन्शन आलं; मात्र वाजपेयी यांनी त्यांचं स्वागत, ‘आओ मॉडेल’ या शब्दांत केलं आणि त्यांच्या जीवात जीव आला. १९९९ मध्ये त्यांनी विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून प्रवेश केला. त्याचवर्षी भाजप-शिवसेना सरकार जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार अस्तित्वात आलं होतं. विरोधात असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, तेलगी घोटाळा, सिंचन घोटाळा, क्रिमी लेअर उत्पन्न वाढवण्याची मर्यादा आदी विषय उपस्थित केले. विरोधी पक्षात बसल्यावर आपण गोपीनाथ मुंडे यांच्यासारखं विरोधी पक्ष नेता व्हावं अशी त्यांची आकांक्षा होती. त्यामुळं फडणवीस यांच्यावर मुंडे यांचा प्रभाव वाढत गेला. आमदारकीचा फॉर्म भरताना, आमदार म्हणून निवडून आल्यावर गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रघात कायमच राहिला आहे. २०१३ मध्ये त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. खरंतर २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर मुंडे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती; मात्र त्यांचं निधन झाल्यानं फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू झालं. २०१४ ला मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी फडणवीस यांच्यासाठी हे प्रदेशाध्यक्षपद चांगलंच कामी आलं. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आला, हे त्यांच्या पथ्यावर पडलं. अर्थात मुख्यमंत्रिपद मिळण्यासाठी आणखीही काही मुद्दे महत्त्वाचे होते. फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आणि संघाच्या विश्वासातले मानले जातात. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. २०१४ नंतर दिल्लीत मोदी-शाह यांचं राज आलं. फडणवीस यांचं त्या दोघांशीही चांगलंच सूत जमलं. त्या-त्या राज्यांमध्ये तेथील बहुसंख्य समुदायाचा मुख्यमंत्री न देता तुलनेनं अल्पसंख्याक असलेल्या समुदायातील नेत्याला मुख्यमंत्रिपद देण्याची रणनीती भाजपनं अवलंबली. त्यामुळं फडणवीस यांना संधी मिळाली.

काँग्रेस आणि शिवसेनेची अनुक्रमे विधान परिषदेची आणि राज्यसभेची जागा फडणवीस यांनी भाजपच्या पारड्यात आणली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवसेना फोडायला लावून सत्तांतर घडवून आणलं. आताही विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची एक जास्त जागा निवडून आणताना विरोधकांत अस्वस्थता निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सातत्यानं संपर्क करून महाराष्ट्रात एकामागून एक चमत्कार घडवण्यात फडणवीस यांनी मोठी कामगिरी केली. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण, अमर राजूरकर आदी नेत्यांना फोडून भाजप आणि मित्रपक्षानं गणित जुळवलं आहे.
सोलापूरमधून या वेळी लिंगायत समाजाला लोकसभेची उमेदवारी देणं शक्य नसल्यानं कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या डॉ. गोपछडे यांना अखेर पक्षनिष्ठेचं फळ मिळालं आहे. राज्यात नव्वद लाख लिंगायत आहे. या समाजात संदेश देण्यासाठी त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली. मेधा कुलकर्णी या पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. त्या दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या;पण गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचं तिकीट कापून त्यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती. आपलं तिकीट कापण्यात कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. पुण्यात बरेच दिवस हे नाराजी नाट्य दिसलं. त्यानंतर अखेर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

फडणवीस यांच्यासाठी सर्वांत मोठं आव्हान होतं ते म्हणजे महाराष्ट्रातील मराठा वर्चस्वाला आव्हान कसं द्यायचं आणि मराठा समाजाचा पाठिंबा कसा मिळवायचा. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं एक मोठं आव्हान त्यांच्यापुढं होतं. राज्यभरात निघालेल्या मराठा मूकमोर्चामुळं त्यांची अडचण झाली होती; पण त्यावर मात करण्यात ते यशस्वी ठरले. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम कदम, विजयसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण आदी कितीतरी नेत्यांची नावं घेता येतील. २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली आणि फडणवीस पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते झाले. कोरोनानं झालेले मृत्यू, अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरण, सचिन वाझे, मनसुख हिरेन, नवाब मलिक या प्रकरणांवर सातत्यानं सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत आपले फासे व्यवस्थित टाकून त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेला कसं चेकमेट केलं, हा अलिकडचा इतिहास आहे. ‘मी पुन्हा येईन’ म्हणताना त्यांनी राज्यातील दोन पक्षांना सुरूंग लावला. राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं, तरी फडणवीस यांचा शब्द अंतिम असतो. त्यांच्याशिवाय फाईल पुढं सरकत नाही, यावरून त्यांचं राज्याच्या राजकारणातील महत्त्व लक्षात यावं. विरोधकांतील बेकीचा आणि तिथल्या अस्वस्थतेचा फायदा घेऊन कायम गळाला लागणाऱ्या माशांवर लक्ष ठेवताना प्रसंगी आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना काही काळ दूर ठेवावं लागले, तरी चालेल, ही मानसिकता फडणवीस यांनी तयार केली आहे. ‘ऑपरेशन लोटस’च्या नावाखाली पाकळ्यांची बेरीज करायची हे चालू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सत्ता हातची गेल्याचं दुःख झालं होतं; परंतु वरून काहीच न दाखवता आतून पक्षविस्तारासाठी जे करायचं, ते सुरूच ठेवलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं मिळवलेल्या यशातून हे सिद्ध होतं होतं. सत्ता गेल्याच्या काळात सत्ताधाऱ्यांच्या मांडीखाली भुंगे लावण्याचे काम सुरू होते. गेल्या पावणेदोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी फडणवीस यांनी चमत्कार केला.

फडणवीस यांचं प्रारंभिक शिक्षण इंदिरा कॉन्व्हेंट या शाळेमध्ये झालं. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना फडणवीस यांच्या वडिलांना अटक करण्यात आली. त्यामुळं वयाच्या सहाव्या वर्षी मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही असं त्यांनी त्यांच्या आईला बजावून सांगितलं. त्यानंतर त्यांचा प्रवेश सरस्वती विद्यालयात करण्यात आला. धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण, नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि जर्मन येथून ‘मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ मध्ये डिप्लोमादेखील केला. त त्यांनी १९९८ मध्ये बर्लिन येथील ‘डहलम स्कूल’मधून बिझनेस मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केला.
देवेंद्र सतरा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झाले. त्यानंतर ते त्यांच्या वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढं आले. वयाच्या फक्त २२ व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकले आणि नगरसेवक झाले. पाच वर्ष चांगल्या रितीनं काम केल्यानंतर ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. १९९७ ते २००१ पर्यंत ते नागपूरचे महापौर होते. यानंतर ते नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले. नागपूरमधील जनता युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष, १९९९ पासून आमदार, १९९२ पासून ते २००१ पर्यंत सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य आणि दोन वेळा नागपूरचे महापौर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस,प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशी कितीतरी पदं भूषवताना त्यांनी प्रत्येक पदाला न्याय दिला. फडणवीस यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘कॉमनवेल्थ पार्लेमेंटियन असोसिएशन’तर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटूसाठीचा वार्षिक पुरस्कार, पुण्याच्या मुक्तछंद या संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, नाशिक येथील पूर्णवाद परिवारातर्फे राजयोगी नेता पुरस्कार, रोटरीचा ‘मोस्ट चॅलेंजिंग यूथ’ म्हणून विभागीय पुरस्कार, राष्ट्रीय अंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार आणि नागपूरच्या नागभूषण फाउंडेशन तर्फे नागभूषण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. त्यांच्यामुळं या पुरस्कारांची उंची वाढली. फडणवीस यांनी १९९९ मध्ये होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग घेतला. वॉशिंग्टन आणि नॅशविले येथे ‘यू.एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स’मध्ये ते सहभागी झाले होते. स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे २००६मध्ये आयडीआयसी, युनेस्को, डब्ल्यूसीडीआर यांच्या द्वारे आयोजित केले गेलेल्या ‘डिसास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावर आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत त्यांनी सादरीकरण केलं. चीन मध्ये बीजिंग येथे ‘डब्ल्यूएमओ-ईएसएसपी’ यांच्या द्वारे आयोजित केलेल्या ‘ग्लोबल एन्व्हायरमेंटल चेंज काँग्रेस’मध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन – इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयावर त्यांनी सादरीकरण केलं. डेन्मार्कमधील कोपेनहेगेन येथे युरोप व आशियामधील तरुण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचं नेतृत्व केलं. २००८ मध्ये अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट-वेस्ट सेंटरतर्फे आयोजित केलेल्या ‘न्यू जनरेशन सेमिनार’मध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्यूज’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि न्यूझिलंडमध्ये २००८ मध्ये गेलेल्या ‘कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन’ च्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाचे ते सदस्य होते.मॉस्कोला २०१० मध्ये भेट देणाऱ्या ‘इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्स’च्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. २०११ मध्ये त्यांनी क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटियन फोरम ऑन हॅबिटाट’ मध्ये सहभाग घेतला.
२०१२ मध्ये फडणवीस यांनी मलेशिया मध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’ मध्ये सहभाग घेतला. केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. फडणवीस यांनी चार मराठी पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील एक पुस्तक ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे आहे. ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र – आत्मनिर्भर भारत’ हे एक ३६ पानी पुस्तक आहे. हे पुस्तक ५ जुलै २०२० ला प्रकाशित झालं.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!