मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याला काही ठिकाणी विरोध होत असून आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या विधानावरुन मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचे केंद्रस्थान असलेल्या बीड जिल्ह्यात शुक्रवारी (ता.
09 ऑगस्ट) राज ठाकरे यांचा ताफा गेला असता, त्या ताफ्यावर काही लोकांकडून सुपारी फेकण्यात आली. सुरुवातीला हे आंदोलक मराठा समाजाचे असल्याचे सांगण्यात आले. पण त्यानंतर ते ठाकरे गटाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली. पण आता याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज ठाकरेंच्या वाहनावर सुपारी फेकणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असतीलही, पण त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, कारण ते मराठा समाजाचे आंदोलन होते, असे राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.