पालघर-योगेश चांदेकर
जिल्हा परिषदेने घेतली पाटील यांच्या समाजोपयोगी कामांची दखल
पालघरः पालघर जिल्ह्यात साडेतीन दशकांपासून ‘महाराष्ट्र टाईम्स’सह अन्य नामांकित दैनिकात पालघर जिल्ह्यातील विविध घडामोडींचे निर्भय आणि निपक्षपातीपणे वार्तांकन करणाऱ्या नरेंद्र पाटील यांच्या कामकाजाची जिल्हा परिषदेने दखल घेतली असून त्यांना ‘पालघर रत्न’ पुरस्कार देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
पाटील हे सुरुवातीला माजी आमदार नवनीतभाई शहा यांच्या ‘पालघर मित्र’ या नियतकालिकात काम करत होते. त्यानंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकात १२ ऑक्टोबर १९८९ पासून ते काम करत आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून पत्रकारितेचे अव्याहत व्रत त्यांनी जपले आहे. समाजवादी चळवळीशी आणि संबंधित संघटनाशी त्यांचा निकटचा संबंध राहिला आहे.
राष्ट्रसेवा दलात जडणघडण
साने गुरुजी यांच्या राष्ट्रसेवा दलात त्यांची जडणघडण झाली. उपेक्षित आदिवासी समाजजीवनाचे प्रश्न त्यांनी मांडले. कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू, आदिवासीबहुल भागातील आरोग्य सेवेतील धिंडवडे त्यांनी शासन आणि लोकांसमोर आणण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले.
मच्छीमार महिलांना लावली बचतीची सवय
पालघर हा उत्तर कोकणातील जिल्हा असून समृद्ध सागरी किनारा लाभलेल्या या जिल्ह्यात मच्छीमारांचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न मांडताना ते सोडवावेत कसे याचे मार्गदर्शन पाटील यांनी त्यांच्या बातमीदारीच्या माध्यमातून केले. मच्छीमार महिलांना बचतीची सवय लागावी, म्हणून श्रमिक महिला पतसंस्थेची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. पालघर जिल्ह्याच्या काही भागात एकेकाळी झुंडशाही, गुंडशाही दहशतीचे प्रस्थ होते. वडराई चांदी प्रकरणात कोणत्याही दहशतीला न घाबरता पाटील यांनी परखडपणे लिखाण केले.
उद्योग पालघरला ठेवण्यात महत्त्वाचा वाटा
पालघर येथील बिडको औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांना गुंडांचा त्रास होत होता. त्या विरोधात अतिशय निर्भीड आणि निपक्षपातीपणे लिखाण केल्यामुळे सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. गुंडांचा बंदोबस्त करण्यास भाग पडले. त्यामुळेच गुजरात राज्यात स्थलांतरित होण्यापासून येथील कारखाने वाचले. आज ही वसाहत व्यवस्थित सुरू आहे. त्याचे श्रेय पाटील यांना जाते.
पत्रकारितेला समाजसेवेची जोड
पालघर जिल्ह्यातील मनोर नजीकच्या दामखिंड भागात ऐंशीच्या दशकात साप्ताहिक आरोग्य सेवा केंद्र चालवण्याची जबाबदारी पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली. या केंद्रांसाठी डॉ. सुभाष पाटकर, डॉ. अरुण नेरुरकर, डॉ. अरुण रूमडे, डॉक्टर ठाकूर आदी आठवड्यातून एकदा उपचारासाठी या केंद्रावर येत असत. त्यांना तेथे आणण्यात पाटील यांचा महत्त्वाचा वाटा होता. ‘नाही रे’ वर्गातील अडल्या नडलेल्या लोकांसाठी निस्वार्थ भावनेने पाटील यांनी काम केले. आदिवासी आणि मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला.
पत्रकार संघाच्या स्थापनेत योगदान
पालघर तालुका पत्रकार संघाची स्थापना करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. नंतर बारा वर्षे त्यांनी या संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. गेल्या वर्षभरापासून पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष या नात्याने ते जबाबदारी पार पडत आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती आणि विविध प्रश्नांचा सातत्याने पाठपुरा करण्याचे काम त्यांनी केले आहे. मराठी पत्रकारिता आणि सामाजिक कामांच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचे त्यांचे मिशन अजूनही सुरू आहे. ‘निऑन फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी लोकोपयोगी विविध कामे केली असून यापुढेही असे काम सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.