पालघर-योगेश चांदेकर
खारेकुरण ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या चौकशीची मागणी
विस्तार अधिकारी यांनी तक्रारदारास प्रकरण मिटवून घेण्याचा दिला सल्ला!
पालघरः खारेकुरण येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा निधी ग्रामसभेचा ठराव न घेता परस्पर वर्ग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचे काम विस्तार अधिकारी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
पंचायत समितीतील ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याची ग्रामपंचायतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असते. ग्रामपंचायतीच्या कारभारात कुठे अनियमितता झाली, तर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांचीच असते. गटविकास अधिकारी कारवाईचा अंतिम निर्णय घेत असतात; परंतु पालघर तालुक्यातील खारेकुरण ग्रामपंचायतीच्या बाबतीत ग्रामसेवक एकनाथ भोये यांना वाचवण्यासाठी ग्रामविस्तार अधिकारी विनोद पाटील आणि गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर हे दोघेही प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे डोळेझाक कुणाच्या आशीवार्दाने?
माजी उपसरपंच संदीप देसले यांनी आता या दोघांविरोधात जिल्हा परिषदेचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असताना त्याकडे पंचायत समिती डोळेझाक करण्याचे धाडस कुणाच्या आशीर्वादावर करते, असा प्रश्न आता यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
विस्तार अधिकारी विनोद पाटील यांनी नाचवले कागदी घोडे
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ठेकेदार यांना शेवटचा हप्ता देताना ग्रामसभेचा ठराव घेतला नाही, त्यावरून आता वादाचा मुद्दा निर्माण झाला आहे. १७ लाख १६ हजार ५३२ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप देसले यांनी केला आहे. याबाबत पहिल्या अहवालात पाटील यांनी ग्रामसेवक एकनाथ भोये निर्दोष असल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली नाही ; परंतु नंतर ‘चमत्कार’ असा झालाकी विनोद पाटील यांनी अहवाल बदलला आणि भोये यांच्यावर दोषी असल्याचा अहवाल दिला. याचा अर्थ ग्रामसेवकाचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी विस्तार अधिकारी विनोद पाटील यांनी फक्त कागदी घोडे नाचवत तक्रारदार यांची दिशाभूल केली
चौकशी अहवालात तफावत कशी?
देसले यांनी आता पाटील यांच्या दोन चौकशी अहवालातील विसंगती निदर्शनास आणली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर पाटील यांनी देसले यांच्याशी संपर्क साधून दोषी असल्याचा अहवाल फाडून टाका असा सल्ला दिला. तो कशासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.
‘ग्रामसेवकाने बील वर्ग करताना यापूर्वी घेण्यात आलेल्या ग्रामसभेच उल्लंघन केले आहे ठराव घेणे आवश्यक असताना पदाचा दुरुपयोग केला. त्यांना पाठीशी घालण्याचे काम विस्तार अधिकारी विनोद पाटील करीत असून गटविकास अधिकारीही त्यांना साथ देत आहेत गेली वर्षभर मी याचा पाठपुरावा करतोय पण अधिकारी याबाबत दुर्लक्ष करत त्यांच्या मर्जीने प्रशासकीय अहवाल कसा बदलला जातो त्याचे जणू काही मला उदाहरणच देत आहेत. ग्रामसेवकाचा भ्रष्टाचार लपणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करणे गरजेचे असून आता याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
संदीप देसले, माजी उपसरपंच खारेकुरण