पालघर-योगेश चांदेकर
४० लाखांचा मुद्देमाल जप्त दोघांना अटक,
ईद, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
पालघरः पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महामार्गावर गस्त घालत असताना मुद्देमालासह सुमारे ४० लाख रुपये किमतीची सुगंधी सुपारी, गुटखा आणि टेम्पो जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गस्त घातली होती. ही गस्त घालत असताना शुक्रवारी रात्री त्यांना मुंबई- अहमदाबाद न महामार्गावरील आंबोली गावच्या हद्दीतील आकाश हॉटेल समोर पार्किंगमध्ये असलेल्या गाड्याबाबत संशय आला. तेथे पार्किंगमध्ये असलेला टेम्पो (क्रमांक जी जे ११ व्ही व्ही ४८१८)मधून सुगंधी सुपारी व पानमसाला जप्त करण्यात आला. हे वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.
२२ लाख रुपयांची सुगंधी सुपारी, गुटखा
ही सुगंधी सुपारी व पानमसाला मुंबई परिसरात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्याच वेळी २१ लाख ७३ हजार ७०५ रुपये किमतीची कॅश गोल्ड व वाराणसी आशिक नावाची सुगंधी सुपारी तसेच गुटखा मिळाला. पोलिसांनी अर्शद गॅसोद्दीन खान (वय ३० वर्ष राहणार बहादुरगंज, तालुका मोहमदाबाद जिल्हा गाझीपुर उत्तर प्रदेश) व रामबहादूर बिराजदार यादव (रा. कमरिया, तालुका मलकापूर जिल्हा गौड, उत्तर प्रदेश) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला. गुजरातमधला हा टेम्पो उत्तर प्रदेशातून बंदी असलेली सुगंधी सुपारी आणि गुटखा मुंबईला नेली जात होती.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनिल हटकर, सुनील नलावडे, दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, संदीप राजगुरे व बजरंग अमनवाड यांनी केली आहे.