पालघर-योगेश चांदेकर
शिक्षण विभागाचे दुकानदाऱ्या करणाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध?
येगारे, वाघमारेंच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात
पालरः जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक वर्गात शिकवण्याऐवजी अन्य व्यवसाय करत असल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. सरकारी पगार घेत असतानाही व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या शिक्षकांच्या या दुकानदाऱ्या बंद करण्याची मागणी आता होत आहे. शिक्षक वर्गावर न जाता बाहेर व्यवसाय करत असल्याचे उघड उघड दिसत असतानाही शिक्षण विभागाने मात्र याकडे डोळेझाक केली असल्याने शिक्षण विभागातील काहींचे यात आर्थिक हितसंबंध आहेत का, याची आता चौकशी होण्याची गरज आहे.
डहाणू तालूक्यात सदानंद येगारे आणि विजय वाघमारे हे दोन प्राथमिक शिक्षक राजकीय लोकप्रतिनिधी यांच्या नावाचा वापर करून गेल्या अनेक वर्षांपासून विविध शाळांना स्टेशनरी, विद्यार्थ्यांचे गणवेश, बूट, मोजे आदी साहित्य पुरवतात. वास्तविक शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त असे अन्य व्यवसाय करता येत नाहीत. असे असताना अनेक शिक्षकांचे अनेक व्यवसाय आहेत. काही शिक्षक ऑनलाईन क्लासेस, तर काही शिक्षक स्वतःच क्लास घेतात. ऑनलाइन पेड सर्विस कोर्सेस देणारे अनेक शिक्षक पालघर जिल्ह्यात आहेत. याशिवाय शिक्षक असूनही वीटभट्टी मालक असणारेही अनेक शिक्षक पालघर जिल्ह्यात असल्याच्या तक्रारी असून आता यासंदर्भात आणखी सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
कुटुंबीयांच्या नावे व्यवसाय
अनेक शिक्षक त्यांचे कुटुंबीय तसेच अन्य व्यक्तींच्या नावे दुकानदाऱ्या करत असून या दुकानदाऱ्या बंद करण्यासाठी आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी समितीची कक्षा वाढवण्याची गरज आहे. येगारे आणि वाघमारे यांच्या दुकानदारीवर ‘लक्षवेधी’ने दोन दिवस प्रकाश टाकल्याने त्याची चर्चा जिल्ह्यातील शिक्षकांत सुरू आहे. आता यात कोणकोण सहभागी आहेत, याची नावेही अनेक शिक्षकांच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर फिरायला लागली आहेत. त्यामुळे खरे तर आता शिक्षण विभागाने तातडीने जागे होऊन संबंधित शिक्षकांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे; परंतु यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता शिक्षण विभाग काही करेल अशी सूतराम शक्यता दिसत नाही.
आर्थिक हितसंबंधामुळे कारवाईला बाधा
केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, कार्यालयातील कर्मचारी अशी अधिकाऱ्यांची एक साखळी कार्यरत असते. या साखळीतून गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंतचे शिक्षक काय काय करतात याची माहिती खरे तर शिक्षण विभागाला असायला हवी. कदाचित ती असेलही; परंतु शिक्षण विभागाचे संबंधित शिक्षकांशी असलेले आर्थिक हितसंबंध शिक्षण विभागाला कारवाई करण्यात अडथळा ठरत असावेत, अशी आता हलक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकूण जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग बदनाम होत असतानाही आत्तापर्यंत शिक्षण विभागाने शिक्षकांच्या अनेक दुकानदाऱ्या सुखनैव सुरू आहेत. याप्रकरणी आता एकेक गंभीर प्रकार समोर येत असून, अनेक शाळांचे संबंधित ठेकेदार संस्थांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळेच की काय एकाच वेंडरला लाखो रुपयांची कामे दिली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकाच वेंडरला ४४ लाखांची कामे
डहाणू तालुक्यातील एका वेंडरला सुमारे अर्ध्या कोटी रुपयांच्या गणवेश शिलाईचे काम दिले आहे. असे आता एका शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मुळात संबंधित शाळात जाऊन विद्यार्थ्यांची मापे, स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे गणवेश खरेदीचे ठराव, संबंधित दुकानदाराची गणवेश पुरवण्याची पात्रता, तो दुकानदार गणवेश कुठून शिवून घेणार आणि ते दर्जेदार असतील का, याची खात्री झाल्याशिवाय खरे तर कुणालाच निविदा देता कामा नये; परंतु अशा लाखो रुपयांच्या निविदा एकाच वेंडरला कशा दिल्या जातात, हा आता संशोधनाचा मुद्दा आहे.
शिक्षण विभागामुळे शिक्षकांचे फावले
डहाणू तालुक्यासारखीच अन्य तालुक्याची स्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या तसेच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या या दुकानदारीकडे दुर्लक्ष केले. किंबहुना त्यांना पाठीशी घातले. यामुळेच अनेक शिक्षकांचे फावले असून आता ते शिकवण्या व्यतिरिक्त अन्य व्यवसायातच अधिक रमले असून त्यातून ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. या सर्व शिक्षकांची आता प्राप्तिकर खात्यामार्फत चौकशी करण्याची आवश्यकता आहे. या संबंधात आता अनेक जण प्राप्तिकर खात्याकडे तक्रारी करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे अशी दुकानदारी करणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करून त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी अधिक वेळ देण्याची व्यवस्था आता जिल्हा परिषदेने करायला हवी!
कर्तव्यकठोर पालवे यांच्यामुळे वेसन बसणार
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे हे अतिशय कर्तव्यकठोर अधिकारी असून त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाच्या दुकानदारीला वेसन घातली आणि संबंधित शिक्षकाला निलंबित केले. आताही जिल्हा परिषदेच्या शाळांचे अनेक प्राथमिक शिक्षक येगारे आणि वाघमारे यांच्याप्रमाणे दुकानदारी करीत असून त्यांची दुकानदारी उघडकीस आणण्यासाठी आता नेमलेल्या समितीची चौकशी कक्षा वाढवण्याची गरज आहे. वाघमारे आणि येगारे यांच्या चौकशीसाठी पालवे यांनी शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांना चौकशीचा आदेश दिला. त्यानुसार चौकशी समिती नेमण्यात आली; परंतु मुळात शिक्षण विभागाच्या हे अगोदर लक्षात का आले नाही आणि आले असेल तर त्यांनी आर्थिक हितसंबंधातून त्याकडे दुर्लक्ष केले असेल, तर आता पालवे यांनी या सर्वांचेही शिक्षकांशी काही आर्थिक हितसंबंध आहेत का, याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी निष्पक्ष अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश करण्याची गरज आहे. शिक्षकांच्या या दुकानदारीला कुणाकुणाचे संरक्षण होते आणि त्यात कोण कोण सहभागी होते, हेदेखील आता पुढे यायला हवे.
वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी कारवाईच्या मनस्थितीत
पालवे यांनी आता चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे यांनीही अतिशय खंबीर भूमिका घेतली आहे. अशा शिक्षकांमुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत असून, त्यांच्यावर कारवाई केली, तरच अन्य ‘उद्योगी’ शिक्षकांध्ये कारवाईचा धसका बसून ते अन्य उद्योग बंद करून शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतील, असा विश्वास व्यक्त करून केवळ शिक्षकांवर कारवाई करून चालणार नाही, तर पंचायत समितीच्या ज्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या या ‘उद्योगां’ना पाठिशी घातले, त्यांच्यावरही कारवाईची गरज आहे. तरच येगारे, वाघमारे प्रवृत्तीचे इतर शिक्षक यांची दुकानदारी संपवल्याशिवाय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची प्रतिमा उंचावणार नाही.
प्रामाणिक शिक्षकांच्या पुढाकाराची गरज
शिक्षण विभागाची आणि सरकारची नियमावली धाब्यावर बसवून शिक्षणाव्यतिरिक्त अन्य ‘उद्योग’ करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई केली, तरच जे शिक्षक प्रामाणिकपणे वर्गात शिकवतात, त्यांनाही न्याय दिल्यासारखे होईल. अन्यथा, अशा दुकानदारी करणाऱ्या शिक्षकांमुळे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष शिक्षकांची ही बदनामी टाळता येणार नाही. त्यासाठी आता कर्तव्यदक्ष शिक्षकांनी आणि गुणवत्तेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षणाची दुकानदारी मांडणाऱ्या शिक्षकांची माहिती गोपनीयपणे पुराव्यानिशी दिली, तर पालघर जिल्ह्यातील गैरव्यवहाराची मोठी साखळी उघडकीस येईल. त्यासाठी आता शिक्षकांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.