Spam Marketing Calls Block TRAI Rules : भारतामधील टेलिकॉम ग्राहकांना सतत येणाऱ्या मार्केटिंग कॉल्सचा त्रास होत होता, मात्र आता या त्रासापासून त्यांची सुटका होणार आहे. सरकारने नव्या नियमांची घोषणा केली असून, आता ग्राहकांना मार्केटिंग कॉल्स येणार नाहीत.
यापूर्वी ग्राहकांना स्वतःहून अशा कॉल्समधून बाहेर पडण्यासाठी निवेदन करावे लागत होते, मात्र आता ही प्रक्रिया उलटी करण्यात आली आहे. ग्राहक आपोआप या कॉल्समधून बाहेर पडतील आणि ज्यांना अशा कॉल्स हवे असतील, त्यांनी टेलिकॉम कंपन्यांना विनंती करावी लागेल.
टेलिकॉम मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की आधी ग्राहकांनी स्वतःहून आपल्या क्रमांकावर मार्केटिंग कॉल्स थांबवण्याची विनंती करावी लागत होती, परंतु आता ही जबाबदारी थेट टेलिकॉम कंपन्यांवर टाकण्यात आली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने हा नियम बदलून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
मार्केटिंग कॉल्ससोबतच फसवणूक करणाऱ्या कॉल्सचाही धोका वाढला आहे. अशा कॉल्समुळे अनेक ग्राहक त्रस्त होते. नव्या नियमामुळे या समस्यांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल अशी अपेक्षा आहे.
याशिवाय, बीएसएनएलच्या यशस्वीतेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ज्योतिरादित्य सिंधीया यांनी स्पष्ट केले. बीएसएनएलचे 4G नेटवर्क लवकरच 100,000 साईट्सवर सुरू करण्याचे उद्दिष्ट असून, 2024 च्या जूनपर्यंत हे काम पूर्ण होईल,असे ते म्हणाले.

















