पालघर-योगेश चांदेकर
स्टेशनरीमध्ये झाडू आणि हार्पिक!
पालघरः समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी खरेदी केलेल्या शैक्षणिक साहित्याच्या खरेदीत पालघर जिल्ह्यात अनेक चमत्कार झाले असून बिले काढण्याच्या नादात अनेक गैरप्रकार झाले असल्याचे उघडकीस आले आहे.स्टेशनरीच्या दुकानात शालेय साहित्य मिळते, हे सर्वज्ञात आहे; परंतु जिल्हा परिषद शाळांनी वेंडरकडून खरेदी केलेल्या स्टेशनरीच्या दुकानातून हार्पिक आणि झाडूही खरेदी केल्याचे दाखवले आहे. त्याची बिले संबंधित शाळांनी वेंडरला अदा केली आहेत. ही बिले अदा करताना शाळेच्या मुख्याध्यापक व संबंधितांना स्टेशनरीच्या दुकानात हार्पिक आणि झाडू कसे मिळतात, हा प्रश्न पडला नाही. त्याचबरोबर काही बिलात तर अतिशय गमती जमती झाल्या आहेत.
झेरॉक्स दुकानातून कपाट खरेदी
काही शाळांनी झेरॉक्सच्या दुकानातून खरेदी केली असून शाळांनी झेरॉक्सच्या दुकानात कपाटे कशी खरेदी केली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याचा अर्थ ही सर्व खरेदी संशयाच्या भोवऱ्यात असून या प्रकरणाची आता जिल्हा परिषदेने गांभीर्याने दखल घ्यायला हवी. समग्र शिक्षा अभियानाच्या नियमानुसार जीएसटी असलेल्या दुकानातून शालेय साहित्य खरेदी केले पाहिजे; परंतु पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या शाळांनी केलेली खरेदी जीएसटी नसलेल्या दुकानातून केली असून ही खरेदीच आता नियमबाह्य ठरली आहे.
मुख्याध्यापकांच्या पगारातून बिलांची वसुली आवश्यक
जीएसटी नसलेल्या दुकानातून केलेल्या खरेदीची बिले कशी दिली, असा प्रश्न आता निर्माण होत असून ही बिले संबंधित मुख्याध्यापकांच्या पगारातून वसूल करण्याची मागणी होत आहे. जिल्हा परिषद शाळेतील खरेदी वादग्रस्त ठरण्याचे कारण म्हणजे ही खरेदी शिक्षक वेंडर असलेल्या दुकानातूनच केली जात असून त्यात संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकाची मिलीभगत असल्याचे दिसते. बोगस पावत्याच्या आधारे केलेली खरेदी ही बोगस असण्याची शक्यता असून खरेदी न करता संबंधित वेंडर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची त्यात टक्केवारी ठरलेली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘उद्योगी’ शिक्षकांचे दणाणले धाबे
आठ-दहा वर्षांपासून हे शिक्षक शालेय साहित्याची दुकाने चालवत असून त्यांना शिक्षण विभाग आणि पदाधिकाऱ्यांचे अभय असल्याचे पुढे आले आहे. काही ठिकाणी तर पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना अप्रत्यक्षरीत्या सूचना करून ठराविक वेंडर कडून खरेदी करण्याचे सुचवल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश काढून चौकशी समिती ही नेमली आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष शिकवणे सोडून अन्य ‘उद्योग’ करणाऱ्या शिक्षकांचे आता धाबे दणाणले आहेत, तर प्रामाणिकपणे आणि निष्ठेने शिकवणाऱ्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पाळेमुळे खणण्याची मागणी
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी याप्रकरणी घेतलेल्या भूमिकेचे पालघर जिल्ह्यातील शिक्षण तसेच अनेक क्षेत्रातून स्वागत होत असून समितीने आता वेंडर, मुख्याध्यापक आदी सर्वांची चौकशी करून या प्रकरणाची पाळमुळे शोधून काढण्याची मागणी होत आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांकडील बिले, व्हाउचर, वेंडरच्या खात्यात जमा झालेली रक्कम आणि शाळेत प्रत्यक्ष उपलब्ध असलेले साहित्य याची तपासणी केली पाहिजे, अशी मागणी आता शिक्षकांनी केली आहे.