पालघर-योगेश चांदेकर
‘लक्षवेधी’चा दणका ; चौकशीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके दाखल
पालघरः समग्र शिक्षा अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या खरेदीतील गैरप्रकाराचा पर्दाफाश ‘लक्षवेधी’ने केल्यानंतर त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे,जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी, जिल्हापरिषद सदस्य,नीता पाटील, व अन्य सदस्यांनी लक्षवेधीमध्ये प्रसारित होत असलेला विषय घेऊन स्थायी समितिच्या बैठकीत लावून धरला. यावेळी शिक्षकांच्या शिकवणे सोडून सुरू असलेल्या अन्य ‘उद्योगां’बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली असून, आता जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी पथके दाखल झाली आहेत.
पालघर जिल्ह्यात समग्र शिक्षा अभियान तर्गत गैरप्रकार कसे चालू आहेत आणि शिक्षकच कसे दुकानदार झाले आहेत, मुख्याध्यापकांची आणि त्यांची कशी मिलीभगत आहे, यावर गेल्या काही दिवसांपासून ‘लक्षवेधी’ प्रहार करीत असून त्याची दखल आता जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतली आहे.
तीस तारखेपर्यंत ‘उद्योगीं’ची माहिती संकलित होणार
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. त्यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात ‘लक्षवेधी’चा उल्लेख केला असून जिल्ह्यातील ‘उद्योगी’शिक्षकांची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत जिल्हा परिषदेला पाठवण्यास सांगितले आहे.
..तर केंद्र प्रमुखांवर कारवाई
या पत्राच्या प्रति पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना मिळाल्या असून, तेही आता कामाला लागले आहेत. शिकवणे सोडून अन्य ‘उद्योग’ करणाऱ्या शिक्षकांची माहिती संकलित करण्याचे आदेश केंद्रप्रमुखांना देण्यात आले आहेत. त्यात केंद्रप्रमुखांनी चुकीची माहिती दिली किंवा अन्य ‘उद्योग’ करणाऱ्या शिक्षकांची माहिती दडवली, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
‘उद्योगी’शिक्षक, मुख्याध्यापक हवालदिल
जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी संगीता भागवत यांच्या आदेशानंतर आता चौकशी समित्यांची वेगवेगळी पथके जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी हजर झाली असून ही पथके तपासणी करत आहेत. ‘लक्षवेधी’ने उघड केलेल्या शिक्षकांच्या नावांबाबत संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती मागवली आहे. याशिवाय ही पथके ही आता संबंधित वेंडर शिक्षकाची तसेच समग्र शिक्षण अभियानांतर्गत झालेल्या खरेदीची चौकशी करीत आहेत. भागवत यांच्या पत्रातही ‘उद्योगी’ शिक्षकांची माहिती लपवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता गटशिक्षणाधिकारी चांगलेच कामाला लागले असून त्यांच्या सतर्क होण्यामुळे ‘उद्योगी’ शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
‘लक्षवेधी’चा दबदबा
चुकीची बिले घेऊन, बोगस पावत्या घेऊन, खरेदी दाखवून प्रत्यक्षात पैसे स्वतःच्या खात्यात जमा करणाऱ्या मुख्याध्यापकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. ‘लक्षवेधी’च्या वृत्त मालिकेची आता संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत असून, आणखी काय काय गैरप्रकार उघडकीस येतात, याची उत्कंठा आता शिक्षण क्षेत्राबरोबरच सामान्य जनतेला लागली आहे. ‘लक्षवेधी’च्या वृत्तानंतर आता जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले असून शिक्षण क्षेत्रात ‘लक्षवेधी’चा चांगला दबदबा निर्माण झाला आहे.
निकम, पालवे यांचे कौतुक
गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांची माहिती आता वेगवेगळ्या घटकांकडून मिळत आहे. या निमित्ताने शिक्षण विभागातील गैरप्रकार उघडकीस येऊन शुद्धीकरण होईल, असा विश्वास सामान्यांना वाटतो आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांचे आता शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत असून, त्यांनी घेतलेल्या परखड भूमिकेने शिक्षण विभागातील गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास आता व्यक्त केला जात आहे.