पालघर-योगेश चांदेकर
पालघर जिल्ह्यात शिक्षकांचा खासगी व्यवसायातून गोरज धंदा
शिक्षण विभागाची पूर्वपरवानगी न घेता चॅनेल
पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना शाळेत शिकवण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही खासगी व्यवसाय करता येत नसताना पालघर जिल्ह्यातील अनेक शिक्षक उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे खासगी व्यवसाय करीत आहेत. त्यातून उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधले जात आहेत; परंतु हे सर्व मार्ग अवैध असून शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता अशा प्रकारचे ‘उद्योग’ राजरोसपणे केले जात आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नितीन समुद्रे या शिक्षकाने आता वेगवेगळ्या कार्यशाळामधून तसेच यूट्यूब चॅनेलमधून पैसे कमावण्याचा धंदा सुरू केला आहे. शिक्षकांना अन्य कोणताही खासगी व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी शिक्षण विभागाच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता असते; परंतु अशी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता नितीन समुद्रे यांनी शाळा शिकवण्याव्यतिरिक्त अन्य ‘उद्योगा’तच जास्त रस दाखवायला सुरुवात केली आहे.
ऑनलाईन वर्गातून लाखोंची वरकमाई
ऑनलाइन क्लास घेऊन त्या माध्यमातून पैसे कमवण्याचा नवा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. काही विद्यार्थी आणि शिक्षकांना हाताशी धरून त्यांनी ‘व्हिडीओ एडिटिंग’चा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या प्रत्येक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शिक्षकांकडून सातशे रुपये,तीनशे तीस,दोनशे रुपये घेऊन त्यांना ‘झूम मीटिंग’द्वारे व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन व अन्य बाबी शिकवल्या जातात. शिक्षकांनाही अशा प्रकारचे विविध संगणकीय अभ्यासक्रम आणि मोबाईल एडिटिंग शिकवून त्यातून अर्थाजन करण्याचा नवा फंडा समुद्रे यांनी सुरू केला आहे.
समुद्रेंचे विष आणि रत्न
भारतीय पौराणिक कथेत श्रावण महिन्यात समुद्रमंथन होऊन त्यातून विष आणि १४ रत्ने बाहेर पडली. त्यातील आठवे रत्न म्हणजे लक्ष्मी. वास्तविक शिक्षकांवर सरस्वती प्रसन्न असते. सरस्वती पाठोपाठ लक्ष्मी ही चोरपावलांनी घरात येत असते. सरस्वती आणि लक्ष्मी सहसा एकत्र नांदत नाही;परंतु शिक्षकांच्या घरी त्या सुखाने नांदतात. असे असताना समुद्रेसारख्या शिक्षकांची पैशाची हौस काही भागत नाही. त्यामुळे शासनाकडून चांगला पगार घेऊन विद्यार्थी यांची गुणवत्ता वाढवण्याऐवजी ते अनेक अन्य ‘उद्योगा’कडे वळतात आणि त्यातून अधिक रक्कम मिळवतात.
‘लक्ष्मी’चा मोह सुटेना
नितीन समुद्रे यांचे तर नाव समुद्रे आहे. समुद्रातून मंथन करून मिळवलेले विष अन्य लोकांना आणि लक्ष्मी मात्र आपल्या पदरी कशी पडेल, याला समुद्रे महत्त्व देतात. आपल्याला असलेल्या समाज माध्यमाच्या ज्ञानाचा उपयोग अधिक पैसे मिळवण्यासाठी कसा केला जातो, हे समुद्रे यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या तंत्रज्ञानाचा आणि समाज माध्यमाच्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात जर उपयोग झाला असता, तर त्यांचे कौतुकच झाले असते; परंतु त्याऐवजी मोबाईलवरचे व्हिडीओ एडिटिंग व अन्य उपक्रम शिकवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना आपल्याशी जोडून घ्यायचे आणि संबंधितांकडून या अल्पकालीन अभ्यासक्रमाचे सातशे रुपये घेऊन त्यातून स्वतःची झोळी भरायची, असा उद्योग समुद्रे यांनी सुरू केला आहे.
कारवाईची प्रतीक्षा
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आता असे खासगी व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून लक्षवेधी बातमीच्या दणक्याने जिल्हा परिषद झालेल्या सर्वसाधारण सभेत या शिक्षकांचा मुद्दा चांगलाच गाजला व प्रशासकीय अधिकारी यांना याबाबत उत्तरे देणे भारी पडले. दरम्यान शिक्षक आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी सर्वगुणसंपन्न कसा होईल, यासाठी करण्याऐवजी आपल्या संपत्तीत अधिक भर कशी पडेल, यासाठी करत असल्याने आता तो वादाचा विषय ठरला आहे. मुळात शिक्षकाला यूट्यूब चॅनेल सुरू करता येते का आणि त्या माध्यमातून पैसे कमवता येतात का हा आणखी एक संशोधनाचा विषय आहे. खरे तर यूट्युब व अन्य समाज माध्यमाचा उपयोग करून समुद्रेसारख्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे ज्ञान आणखी अद्ययावत करण्यासाठी उपयोग केला असता, तर त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली असती; परंतु त्याऐवजी व्हिडीओ एडिटिंग, ॲनिमेशन व अन्य बाबी तसेच यूट्यूब चॅनेल या माध्यमातून पैसे कमावण्याचा गोरज धंदा समुद्रे यांनी सुरू केला असून आता शिक्षण विभागाने त्यांच्यावर सखोल चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यातील अशा खाजगी दुकानदारी करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेणे गरजेचे असून त्यांची त्यांनी थाटलेली दुकाने तात्काळ थांबवायला हवीत जेणेकरून विद्यार्थी यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात येणार नाही.