banner 728x90

पालघर जिल्ह्यात डमी शिक्षक ; तिसरे अपत्य असलेले ही शासन सेवेत : जिल्हा परिषदेच्या कारवाईकडे लक्ष

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

banner 325x300

पालघरः प्राथमिक शिक्षकांनी शाळेत शिकवण्याऐवजी अन्य उद्योग सुरू केले असून, आता काही शिक्षक तर पूर्ण वेळ इतर व्यवसाय करत असताना त्यांच्या जागी शिकवण्यासाठी डमी शिक्षकाची नियुक्ती केली असल्याची चर्चा पालघर जिल्ह्यात सुरू आहे तसेच तीन अपत्य असलेले अनेक शिक्षक शासकीय सेवेत असून शासनाची ही फसवणूक आहे.

शिक्षकांनी शाळेत शिकवण्याचे काम करणे आवश्यक आहे; परंतु त्याऐवजी शिक्षक आता अन्य उद्योग मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यात काही शिक्षक दांपत्य शाळेत शिकवण्याऐवजी मेडिकल दुकाने थाटून बसले आहेत. मेडिकलचे लायसन दुसऱ्याचे घेऊन अनेक शिक्षकांनी मेडिकल दुकाने सुरू केली आहेत. अन्य उद्योगांना प्राधान्य देताना शिक्षणाला मात्र हे शिक्षक दुय्यम स्थान देत आहेत.

परस्परांना सांभा‍ळून घेताना विद्यार्थ्यांचे नुकसान
द्विशिक्षकी शाळा असलेल्या शाळांमध्ये एक शिक्षक आठवडाभर असतो, तर दुसरा शिक्षक दुसऱ्या आठवड्यात शाळेत हजर असतो. दोघांच्याही हजेऱ्या लावल्या जात असल्याची चर्चा असून. शिक्षक परस्परांना सांभाळून घेतात आणि असे करताना अन्य व्यवसायाला प्राधान्य देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होते. गटशिक्षणाधिकाऱ्यापासून केंद्रप्रमुखापर्यंत सर्वांना ही माहिती असतानाही त्याकडे डोळेझाक केली जात आहे.

नियुक्ती एकाची, शिकवायला दुसराच
जिल्हा परिषद प्रशासनाने आता कारवाई सुरू केली असली, तरी ज्या शाळांत शिक्षक गैरहजर असतात आणि दुसरे शिक्षक तिथे शिकवतात, त्यांचीही आता चौकशी होण्याची आवश्यकता आहे. पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांची संलग्न असलेल्या शिक्षक संघटना आहेत. या शिक्षक संघटनांचे पदाधिकारी स्वतःच्या कामानिमित्त व संघटनेच्या नावाखाली बाहेर असतात. वर्गावर मात्र ते जात नाहीत, अशा तक्रारी आहेत. त्यापैकी काही तर वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. काहींची मोठमोठे दालने आहेत. काही बिल्डर झाले आहेत, तर काही वेंडर आहेत. हे शिक्षक वर्गावर जाऊ शकत नसल्याने त्यांनी आता त्यांच्या जागेवर जाऊन शिकवण्यासाठी नवीन डमी शिक्षकांची नियुक्ती केली असल्याची चर्चा जोरदार सुरू असून याबाबत जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अशी प्रकरणे उघडकीस येतील याकरिता शिक्षण विभागाने विविध पथकाद्वारे शाळा तपासणी करून ग्रामस्थांची चौकशी केल्यास या सर्व बाबी समोर येतील

डमी शिक्षकांचा पगार मूळ शिक्षकांकडून
दहा पंधरा हजार रुपये पगारांवर या डमी शिक्षकांकडून काम करून घेतले जाते. मूळ शिक्षकांना ६०-७० हजार रुपये पगार असताना ते त्यांच्या पगारातील दहा-पंधरा हजार रुपये डमी शिक्षकांना देतात आणि शाळेत स्वतःची हजेरी लावून घेतात. या बेकायदेशीर बाबीकडे प्रशासनाचे तसेच पदाधिकारी यांचे नियंत्रण व कोणाचेच लक्ष नसल्याने शासनाची ही फसवणूक करून असे शिक्षक मोकाट सुटले असून. याप्रकरणी केंद्रप्रमुख व गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अधिक कडक कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे

दोन अपत्य धोरणाला मूठमाती
राज्य सरकारने २८ मार्च २००५ रोजी एका अधिसूचना काढली. या अधिसूचनेनुसार लहान कुटुंब ठेवण्यासाठी शिक्षकांकडून किंवा अन्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आली. या प्रतिज्ञापत्रात संबंधितांनी २८ मार्च २००५ नंतर अपत्य झाल्यास होणाऱ्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे, असे लिहून दिले. त्यात फक्त दोन गोष्टींचा सरकारने अपवाद केला आहे. २८ मार्चपूर्वी गरोदर असलेल्या आणि त्यानंतर बाळंत झालेल्या महिलेच्या बाबतीत हा अपवाद करण्यात आला. दत्तक मूलाचा तिसऱ्या अपत्यात समावेश नाही. असे असताना २८ मार्च २००५ नंतर अनेकांना तिसरे अपत्य झाले असून ही बाब त्यांनी शासनापासून लपवून ठेवून, फसवणूक केली आहे. असे अनेक शिक्षक पालघर जिल्ह्यात कार्यरत असून त्याचाही शोध घेण्याची मागणी आता होत आहे.

नियमातील संदिग्धतेचा गैरफायदा
कागदोपत्री नोंदी करायच्या नाहीत किंवा दत्तक दाखवायचे असे फाटे या नियमाला फोडले जात असून नियमातील तरतुदीतील संदिग्धतेचा गैरफायदा घेतला जात आहे. या प्रकरणात शासनाची मोठी फसवणूक होत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या प्रकरणी कसून चौकशी केली, तर पालघर जिल्ह्यात तिसरे अपत्य असलेले अनेक शिक्षक कार्यरत असलेले दिसतील. २८ मार्च २००५ नंतर तिसरे अपत्य झालेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा बडगा आता जिल्हा परिषदेने उचलण्याची गरज आहे. तसे झाले, तर अनेक शिक्षकांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. ही कारवाई करण्याचे धाडस जिल्हा परिषद दाखवणार आहे का, हाच खरा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!