banner 728x90

करारी आप्पा…..योगेश चांदेकर यांच्या विशेष लेखणीतून विशेष संपादकीय

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघर- एखाद्या परिसरावर सलग तीस-पस्तीस वर्ष राज्य करणं तसं सोपं नसतं. दहशतीच्या जोरावर असं साम्राज्य कधीच टिकत नाही. लोकांची कामं करावी लागतात, त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. पालघर जिल्ह्याबाहेरचे लोक काहीही म्हणत असले, तरी हितेंद्र ठाकूर उर्फ आप्पा यांनी पालघर जिल्ह्यातील वसई-विरार परिसरात आपलं साम्राज्य लोकांची मनं जिंकून प्रस्थापित केलं आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. त्यांना लक्षवेधीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

banner 325x300

वसई-विराच्या राजकारणात १९९० पासून आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. या पक्षाकडं तीन आमदार आहेत. एकदा पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचा खासदारही निवडून आला होता. देशात काँग्रेसचं सरकार असो किंवा हिंदुत्वाची लाट; वसई-विरारच्या साम्राज्याचा सूर्य कधी झाकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्मा काळातही वसई-विरारमधील आप्पांचा बालेकिल्ला अभेद्य राहिला. कधी शिवसेना तर कधी भाजपनं आप्पांच्या साम्राज्याला धडका देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचाच कपाळमोक्ष होण्याची वेळ आली. अनेकदा विधान परिषद, राज्यसभेच्या निवडणुकीत मोठमोठ्या पक्षांना आप्पांची पायधरणी करण्याची वेळ आली. हे कसं झालं, का झालं, आप्पांची वसई-विरात परिसरावर एवढी ताकद कशी झाली, हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आप्पांनी सुरुवातीच्या काळात महाविद्यालयीन जीवनात राजकीय धडे गिरवले. काही काळ भाई ठाकूर यांच्या प्रतिमेमुळं त्यांना वेगवेगळ्या टीकेला सामोरं जावं लागलं;परंतु त्यावर मात करून ते पुढं जात राहिले. कधी कधी नकारात्मक प्रतिमाही सकारात्मकतेत कशी बदलता येते, हे आप्पांनी दाखवून दिलं. पूर्वी वसई हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. त्या वेळी हितेंद्र ठाकूर यांचे काका काँग्रेसमध्ये होते. त्यांचं बोट धरूनच आप्पा राजकारणात आले. तरुण नेतृत्व असल्यानं काँग्रेसनं १९९० मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवार दिली. निवडून येण्याचा निकष असं शरद पवार यांनी त्यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं होतं. मिळालेल्या संधीचं आप्पांनी सोनं केलं आणि विक्रमी मतांनी निवडून आले. जनता दलाच्या डॉमिनिक घोन्साल्विस यांचा पराभव करून विधानसभेत त्यांनी प्रवेश केला, तेव्हापासून त्यांचा राजकारणात असलेला दबदबा अजूनही कायम आहे. १९९० च्या दशकात वसई- विरार परिसरात गुंडगिरी आणि दहशत टोकाला गेली होती. एका प्रकरणात ‘टाडा’ कायद्याखाली त्यांना अटक झाल्यानंतर काँग्रेसनं त्यांची पक्षातून हाक्कलपट्टी केली; परंतु १९९५ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले. राज्यातील एका बड्या राजकारणी नेत्याची त्यांची असलेली सलगी तेव्हा वादाचा विषय ठरला होता; परंतु नंतर मात्र सर्वच बड्या नेत्यांना कधी ना कधी आप्पांशी सलगी करावी लागली, हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून यायला ठाण्यातील एका बड्या नेत्याला कायम आप्पांची मदत लागायची. साम, दाम, दंड, भेद अशा नीतीचा आरोप त्यांच्यावर होत होता; परंतु आरोप हे आरोप असतात आणि दहशतीच्या जोरावर कायम राजकारण करता येत नाही, हे टीकाकारांनी आणि आरोपकर्त्यांनी कधी लक्षात घेतलं नाही. आरोपकर्त्यांना त्यांचीच मदत अनेकदा घ्यावी लागली. पुढं ‘टाडा’ आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली. पक्षीय राजकारणाचे तोटे जास्त असतात, हे लक्षात घेतल्यानंतर त्यांनी कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षात न जाता स्वतःचाच पक्ष स्थापन करून निवडणूक लढवण्याचा ठरवलं. सुरुवातीला वसई विकास मंडळ आणि नंतर बहुजन विकास आघाडीची स्थापना करून त्यांनी पालघर जिल्ह्यावर आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवलं. बहुजन विकास आघाडीची स्थापना करतानाही त्यांनी कायम आपला पक्ष हा एक जात किंवा धर्मापुरता मर्यादित ठेवला नाही. वसई-विरार परिसरात या पक्षानं सातत्यानं ‘सोशल इंजिनीयरींग’ला महत्त्व दिलं. सर्वसामान्य मुस्लिम, ख्रिस्ती, आदिवासी, दलित महिला आदी घटकांना या पक्षानं प्रतिनिधीत्व दिलं. वसई-विरारचं नागरिकीकरण वेगात होत असताना महापालिकेतील सत्येमधून आप्पांनी वेगवेगळ्या जाती, धर्मातील लोकांना नगरसेवक म्हणून निवडून आणून ‘सोशल इंजिनिअरींग’चा वेगळा प्रयोग केला. त्यातून या पक्षाला सातत्यानं यश मिळत गेलं. वसई-विरारपुरतं मर्यादित न राहता आपला पक्ष पालघरच्या वाड्या, वस्त्यांमध्ये नेण्याची रणनीती आप्पांनी अवलंबली. आणि त्याला यश आलं. २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन पालघर मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर बहुजन विकास आघाडीचा पहिला खासदार निवडून आला. तीन आमदार, एक खासदार आणि शहरातील महापालिकेची सत्ता, जिल्हा परिषद सदस्य अशी मोठी ताकद आप्पांनी निर्माण केली २००१ मध्ये काँग्रेस सरकार अल्पमतात आलं होतं. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आघाडी सरकारला पाठिंबा देताना आप्पांनी वसई, विरार पाणी प्रकल्प मंजूर करून घेतला. त्यामुळं त्यांची प्रतिमा आणखीन उंचावली आणि लोकप्रियता कमालीची वाढली.

अपक्ष असल्यानं आप्पांना आपल्या मर्यादा माहित आहेत. त्यामुळं त्यांनी वरच्या पातळीवर सत्ताधाऱ्यांशी कधीच संघर्ष केला नाही. सत्ताधारी कोणीही असला, तरी त्याला ते समर्थन देत राहिले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत आप्पांच्या तीन आमदारांनी भाजपला साथ दिली. यापूर्वी कधी ते काँग्रेस सोबत, कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिले. शिवसेनेसोबत त्यांचं पूर्वी फारसं कधी जमलं नाही; मात्र उद्धव ठाकरे यांच्या निकट असलेल्या एका नेत्यासोबत त्यांनी जुळवून घेतलं. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आप्पांचं फारसं कधी सख्य दिसलं नाही; परंतु विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं शिंदे यांनी आप्पांवर स्तुतीसुमनं उधळली. पालघरच्या राजकारणात आप्पांचं महत्त्व कसं आणि किती आहे, हे यामुळे अधोरेखित झालं. सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेताना त्यांनी स्वतःचं हीत कधीच पाहिलं नाही. कायम परिसराच्या विकासासाठी, कामं मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध ठेवले. गुंडगिरी, दहशतीचे आरोप आप्पांच्या कायम पथ्यावर पडल्याचं वेगवेगळ्या निकालातून दिसून आलं. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी आप्पांना गोळ्या घालण्याची भाषा केली. प्रदीप शर्मा हे शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शर्मा यांना ठाकूर यांच्या विरोधात उतरवण्याची खेळी शिंदे यांचीच होती; मात्र शर्मा यांच्या वक्तव्याचा उलट परिणाम झाला आणि आप्पांना सहानुभूती मिळाली. बहुजन विकास आघाडीच्या क्षितीज ठाकूर यांनी शर्मा यांचा दणदणीत पराभव केला. आप्पांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांची पत्नी प्रवीणा ठाकूर या वसई विरार महापालिकेच्या पहिल्या महापौर होत्या. आप्पांनी मुंबई आणि महाराष्ट्रात शाळा आणि महाविद्यालयाचं जाळं निर्माण केलं आहे.

दरवर्षी वसई कला व क्रीडा महोत्सवाचं आयोजन ते करत असतात तसंच साहित्य संमेलन, कीर्तन महोत्सव आणि नाट्य महोत्सव भरवण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. ते ‘हितेंद्र यंग स्टार ट्रस्ट’चे अध्यक्ष आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक जिम सुरू केल्या असून अनेक तरुणाची शरीरं त्यांनी घडवली आहेत. युवक काँग्रेसच्या तालुकाप्रमुखांपासून राजकारणाची सुरुवात केलेल्या आप्पांना शरद पवार यांनी पहिली उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे निवडून येण्याअगोदरच उमेदवारी जाहीर होताच विरारमध्ये दिवाळी साजरी झाली होती. अवघ्या २९ व्या वर्षी आमदार झालेल्या आप्पांनी नंतर मात्र कधी मागं वळून पाहिलंच नाही. आप्पा बिनधास्त आणि बेधडक आहेत. त्याचबरोबर सामाजिक सेवेत त्यांचा हात कुणीच धरू शकणार नाही. मुंबई, विरार वसई परिसरातून शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांना थांबण्यासाठी त्यांनी शिर्डीत पालखी निवारा सुरू केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत आता मी यापुढची निवडणूक लढवणार नाही, असं आप्पांनी जाहीर केलं असलं, तरी आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते काय करणार याची उत्सुकता सर्वांना लागली असणं स्वाभावीक आहे. राजकारणात स्थिरस्थावर झाल्यावर आप्पांनी बांधकाम व्यवसाय प्रवेश केला. त्यांनी वसई-विरार परिसरात शेकडो बांधकामं केली. शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था ही मोठ्या प्रमाणात उभारल्या आहेत. बिल गेटसारख्या धनाढ्य व्यक्तीला विरारमध्ये त्यांनी आणलं. एवढंच नव्हे, तर अध्यात्मक गुरु श्री श्री रविशंकर यांनाही विरारमध्ये आणलं होतं. दहशतीच्या पलीकडं जाऊन एक सभ्य राजकारणी होण्यात ठाकूर कुटुंबानं जे टायमिंग साधलं, ते वाखाणण्याजोगं आहे. जनहिताची कामं केल्यामुळेच त्यांच्या पक्षानं वसई, विरार आणि नालासोपारा भागात लोकप्रियता मिळवली. त्यांच्या पक्षाचे तीनच आमदार असले, तरी विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना किती महत्त्व येतं, हे वेगवेगळ्या अनुभवातून प्रत्ययाला आलं आहे. आप्पांना अनेकांनी डिवचलं. त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. आप्पांनी जशास तसं उत्तर दिलं असलं, तरी त्यांनी आपलं कार्यकर्त्यांचं मजबूत संघटन कधीच दुर्लक्षित केलं नाही, हेच त्यांच्या यशाचं खरं गमक आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!