मे २०२१ च्या तौक्ते वादळामुळे व सोबतच्या पावसाने सर्व ठिकाणी हाहाकार माजवला. ठिकठिकाणी झाडे पडून विद्युत वाहिन्या तुटल्या व खांब खाली पडले होते. बऱ्याच ठिकाणी पाणी साचले होते. जन जीवन ठप्प झाले होते. असे असताना वसई विरार शहर महानगर पालिकेचे आणि महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधिकारी वर्ग व कर्मचाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेऊन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी कंबर कसली. काही जणांनी तर सलग दीड – दोन दिवस कामावर होते.
गावातील तरुणांनी पण सर्व झाडे कापण्यास सुरुवात केली त्या मुळे विज पुरवठा कर्मचाऱ्यांना पुढील काम करण्यास सोपे झाले. विद्युत मंडळाचे श्री संभाजी सोलाट व त्यांचे सहकारी आणि सफाई कर्मचारी पर्यवेक्षक श्री अमर चौधरी व त्यांचे सहकारी यांचे जमिनीवरील प्रत्यक्ष काम खुप मोठे होते.त्यांचे योगदान आम्ही कधी विसरू शकत नाही. अग्निशामक दलाने ही तत्परता दाखवून गाडी पाठवून मोठया झाडांचा अडसर दूर केला.
त्यांच्या अश्या वाखावण्याजोग्या कामामुळे उमेळा ग्रामस्थांतर्फे मंगळवार दि. 8 जुन , 2021 रोजी दुपारी 2 वाजता उमेळा गावात ह्या कर्मचारी व अधिकारी वर्गाचा भेटवस्तू देऊन नागरी सत्कार करण्यात आला. ह्या वेळी विद्युत मंडळाचे मुख्य अभियंता श्री महेश माधवी , वसई विरार शहर महानगर पालिकेचे प्रभाग आय चे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री विकास पाटील आणि अग्निशमन दलाचे श्री मिलिंद दळवी उपस्थित होते.
ह्या वेळी बोलताना श्री महेश माधवी म्हणाले की वसई परिसरात दोनशेहुन अधिक खांब पडले होते व विद्युत वाहिन्या तुटल्या होत्या. उमेळा येथील पॉवर स्टेशनला विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या खाडीच्या परिसरात तुटल्या होत्या. तरी पण समयसुचकता दाखवून मुख्य विद्युत पुरवठा सुरू करण्यात तात्पुरते यश मिळाले. कर्मचाऱ्यांनी पण फार मेहनत घेतली. पण आज आपण केलेल्या सत्काराने एक नवीन हुरूप आला आहे. कारण त्या दरम्यान लोकांच्या तक्रारी फार होत्या. माझ्या कारकिर्दीत असा नागरी सत्कार मी पहिल्यांदा अनुभवत आहे . त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक करून आभार मानले .
महानगर पालिकेचे श्री विकास पाटील ह्यांनी सांगितले की त्या वेळी ठिकठिकाणी कचरा व पाला पाचोळा जमा होऊन पाणी जाण्याचे मार्ग बंद होत होते. कर्मचाऱ्यांनी भर पावसात हे मार्ग मोकळे केले. हे जादा साफ सफाईचे काम आता पर्यंत चालू होते. नागरिकांनी आपला कचरा भर रस्त्यात अथवा गटारात न टाकता व्यवस्थित ठिकाणी ठेवा. सफाई कर्मचारी उचलून नेतील. उमेळा ग्रामस्थांनी केलेल्या नागरी सत्काराबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
अग्निशमन दलाचे श्री मिलिंद दळवी ह्यांनी ह्या सत्काराबद्दल आभार मानले व असा सत्कार ह्या वसईत पहिल्यांदा होत आहे हे नमूद केले. ह्या प्रसंगी उमेळा गावचे माजी सरपंच श्री भालचंद्र चौधरी व प्रथम नगरसेवक श्री प्रवीण वर्तक ह्यांची भाषणे झाली. गावातील तरुणांचे ही पुष्प देऊन कौतुक करण्यात आले.
मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ह्या कार्यक्रमाचे संयोजन व सूत्र संचालन श्री दिलीप अनंत राऊत ह्यांनी केले. गावातील सगळ्यांनी ह्या कामी सहकार्य केले .
~~~|