पालघर-योगेश चांदेकर
आमदारांचे निकटवर्तीय असल्याने कामे वाटपात पारदर्शकता अपेक्षित
मजूर सहकारी संस्थांचे प्रश्न मार्गी लागणार
पालघरः पालघर-ठाणे मजूर सहकारी संस्था संघाच्या (फेडरेशन) संचालकपदी डहाणू येथील कुशल राऊत यांची व सोमटा येथील दत्तात्रय वझे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांना कामे वाटपात न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. हे दोघेही आमदारांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्याकडून कामे मिळण्यात अधिक मदत व पारदर्शकता असावी, अशी अपेक्षा मजूर सहकारी संस्था व्यक्त करीत आहेत.
विविध शासकीय बांधकामे मजूर सहकारी संस्थांमार्फत केली जातात. दोन वा तीन लाख रुपयांच्या आतील खर्चाची सरकारी कामे या संस्थांमार्फत केली जातात. त्यासाठी मजूर सहकारी संस्थांची स्थापना, नोंदणी करावी लागते. निविदेला वळसा घालून ही कामे केली जात असल्याने सुरुवातीला सुशिक्षित बेरोजगारांची सोय म्हणून या कामांकडे पाहिले जात होते; मात्र नंतर मजूर सहकारी संस्थांमधून कामे घेऊन, ती न करता इतरांना देऊन संस्था श्रीमंत झाल्याची उदाहरणे ही अनेक आहेत. त्यातून अनेक जण लक्षाधीश, कोट्यधीश झाले. अनेकांच्या राजकारणाचा महामार्ग याच संस्थांच्या कारभारातून सुरू झाला. विशेषतः जिल्हा बँकेत संचालक म्हणून जाण्यासाठी ‘लेबर फेडरेशन’ हा अत्यंत सोयीचा मार्ग समजला जातो. काही वर्षांपूर्वी लेबर सोसायटीमधील असलेला हा मतदारसंघ जिल्हा बँक निवडणुकीतून हद्दपार झाला असला, तरी विविध तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अद्यापही कायम आहे.
आमदारांच्या दृष्टीने निवडी महत्त्वाच्या
अनेक आमदार या निवडणुकीत व्यक्तिशः लक्ष घालतात. आपली माणसे त्यावर निवडून आणणे त्यांना महत्त्वाचे वाटते. या पार्श्वभूमीवर ठाणे-पालघर मजूर फेडरेशनच्या संचालकपदी निवड झालेल्या राऊत व वझे यांच्याकडून मजूर सहकारी संस्थांच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. मजूर सहकारी संस्थांमार्फत आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून बहुतांशी कामे होत असतात. त्यामुळे स्थानिक विकास निधीतील रिकामे मजूर सहकारी संस्थांना देण्यात राऊत आणि वझे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे.
मजूर संस्थांच्या कामाच्या मर्यादात वाढ हवी
ई-टेंडर मुळे मजूर सहकारी संस्थांवर बालंट आले आलेले असताना आता अनेक आमदारांनी एकत्र येऊन मजूर सहकारी संस्थांना मिळणाऱ्या कामांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची तसेच महापालिकांची कामेही मिळण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आमदारांच्या दोन निकटवर्तीयांची ठाणे-पालघर मजूर फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड होणे याला अतिशय महत्त्व आहे. मजूर सहकारी संस्थांना मिळणाऱ्या कामांच्या मर्यादा जर वाढल्या, तर या सहकारी संस्थांचे महत्त्व वाढेल हे निश्चित.
मजूर संस्थांचे प्रश्न सरकार दरबारी सुटावेत
कुशल राऊत व दत्तात्रय वझे हे गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसायात सक्रिय असल्यामुळे त्यांना बांधकाम व्यवसाय व मजूर सहकारी संस्थांच्या अडचणीची माहिती आहे. त्यांनी आत्तापर्यंत तळागाळातील नागरिकांसाठी महत्त्वाचे काम केले आहे. राऊत हे डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले यांचे जवळचे सल्लागार म्हणून काम पाहतात. त्यांना मजूर सहकारी संस्थांच्या समस्या, त्या दूर करण्यासाठीचे उपाय चांगलेच माहीत आहेत, तर वझे हे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. हे दोघे निवडून आल्यामुळे मजूर सहकारी संघाच्या उपक्रमांना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील चालना मिळेल, मजुरांच्या समस्यांसाठी अधिक बळ मिळेल अशी भावना व्यक्त केली जात आहे. या दोघांमुळे मजूर सहकारी संस्थांना अधिकाधिक कामे मिळतील, त्याच्या अडचणी आमदारांच्या माध्यमातून राज्य सरकारी पातळीवर मांडल्या जातील आणि सरकार दरबारात मजूर सहकारी संस्थांचे अडचणी सोडवल्या जाऊ शकतील, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे.