banner 728x90

आमदार निकोले यांना डहाणूतून पुन्हा उमेदवारी

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेक
पालघर जिल्ह्यातील पहिली उमेदवारी जाहीर
प्रचार नियोजनही ठरले

पालघरः जनसामान्यांचा नेता आणि राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणून ओळख असलेल्या आ. विनोद निकोले यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची डहाणू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. पालघर जिल्ह्यात उमेदवारी जाहीर झालेले निकोले हे पहिलेच उमेदवार आहेत. त्यांच्या विजयासाठी आत्तापासूनच प्रचाराचे नियोजन ठरले असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

banner 325x300

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन पाच दिवस झाले असले, तरी अद्याप अन्य कुठल्याच पक्षाने अधिकृतपणे कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली नाही; परंतु आ. निकोले यांना मात्र अगोदरच उमेदवारी जाहीर झाली आहे. अतिशय छोट्या घरात राहत असलेल्या आणि अजूनही प्रत्यक्षात परसबागेत आणि छोट्या शेतीत काम करत असलेल्या आ. निकोले यांचे पाय कायम जमिनीवर आहेत.

जनतेचा आमदार
जनसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने प्रशासन आणि सरकारची संघर्ष करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आदिवासींच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी गेल्या; मात्र त्यांना पुरेशी नुकसान भरपाई मिळाली नसल्याने अशा प्रकरणात थेट प्रशासनाशी दोन हात करून संबंधितांना योग्य ती मदत मिळण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कामाची दखल म्हणून पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पास्कल धनारे यांचा पराभव करून निकोले निवडून आले होते.

प्रश्न मांडण्यातही आघाडीवर
वर्षानुवर्ष जनसामान्यात राहून चळवळ उभी करणाऱ्या आणि अतिशय कमी खर्चात निवडणूक लढवून ती जिंकणाऱ्या आमदार निकोले यांचे आकर्षण केवळ पालघर जिल्ह्यालाच आहे, असे नाही, तर संपूर्ण राज्यात त्यांच्या साधेपणाची चर्चा होत असते. केवळ साधा, गरीब आमदार म्हणूनच त्यांची ओळख आहे, असे नाही, तर सामान्यांचे प्रश्न विधानसभेतही तेवढ्याच ताकदीने मांडणारा आणि सातत्याने विधानसभेतील चर्चेत गांभीर्याने भाग घेणारा आमदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. पालघर जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न मांडणारे आणि राज्यात प्रश्न मांडण्यात सातवा क्रमांक असलेले आ. निकोले धोरणात्मक चर्चेतही तेवढ्याच हिरीरीने भाग घेत असतात.

महाविकास आघाडीमुळे पारडे जड
टँकरमध्ये बसून सामान्यांपर्यंत पाणी पोहोचवणारा हा आमदार विकासासाठी सातत्याने धडपडतो आहे. त्यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून राज्यात अन्य मित्र पक्षांना किती जागा सोडायच्या, याचा निर्णय महाविकासाकडे घेऊ शकली नसली, तरी डहाणू विधानसभा मतदारसंघाबाबत मात्र महाविकास आघाडीमध्ये त्याबाबत कोणताच संदेह नसल्याने त्यांची उमेदवारी अगोदरच जाहीर करण्यात आली. यापूर्वीच पालघर जिल्हा कमिटीने तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन येथे कार्यशाळा घेऊन या कार्यशाळेत विधानसभा निवडणुकीसाठीची प्रचार यंत्रणा कशी राबवायची याची आखणी केली. त्यात ३६५ हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिलांचाही त्यात सहभाग होता. माकप आणि महाविकास आघाडीच्या समन्वयामुळे आता डहाणूतील निवडणूक अधिक रंगतदार होणार असून आमदार निकोले यांचे पारडे जड आहे.

प्रतिस्पर्धी कोण एवढीच उत्सुकता
डहाणू विधानसभा मतदारसंघात वाढवण बंदर होत असून या बंदराचा पुरस्कार भाजप आणि महायुतीने केला असला, तरी महाविकास आघाडी, मच्छीमार संघटना तसेच स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीतही हाच मुद्दा चर्चेला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यात होत असलेले विविध प्रकल्प, त्यासाठी जमिनीचे संपादन आणि त्यात शेतकऱ्याची होत असलेली फसवणूक तसेच विकासाच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या, तरी अद्यापही आदिवासी व अन्य समाज घटकांपर्यंत विकासाचा सूर्य अद्याप उगवलाच नसल्याने त्याबाबत माकप आणि महाविकास आघाडीने उठवलेला आवाज, आदिवासी उपाययोजनातील निधी अन्य घटकांकडे वळवण्याचे प्रकार यावर आता भर असून आमदार निकोले यांच्या विरोधात महायुती कोणाला उमेदवारी देते याकडे लक्ष लागले आहे. महायुतीचा उमेदवार कोणीही असला, तरी आमदार निकोले यांच्या विजयासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी जीवाचे रान उठवले असल्याने निश्चितच निकोले यांचे पारडे जड राहणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!