गेल्या १६ वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या मनात धुमसणाऱ्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आम्हाला समाधान वाटते आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचा संविधानिक अधिकार आम्ही आतापर्यंत केवळ मायबाप जनतेसाठी वाचक – प्रेक्षकांसाठी करत आहोत. नागरिकांच्या न्यायोचित हक्कांसाठी आम्ही संघर्षाची तुतारी गर्जत ठेवली. वृत्त लेखणी असो की माईक बुम असो, आम्ही अन्यायावर सातत्याने घणाघात केला आहे. जिल्ह्यातील व राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या संवेदनांची जाण असल्याने आमच्या बातम्यांमध्ये प्रतिबिंबित झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि जोशाने याच जनतेच्या मनातील भावनांचे लक्ष वेधून घेण्यासाठी लक्षवेधी हे ऑनलाईन वार्तापत्र आपणासाठी घेऊन येत आहोत.
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा काळात ऑनलाइन प्रसारमाध्यमे अधिक परिणामकारक आणि प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माध्यमे लोकांशी अधिक जवळीकता साधणारी असल्याने त्याची व्याप्ती खूप मोठी असते. शिवाय यामध्ये सत्य परिस्थितीचा स्पर्श असल्यामुळे वार्तापत्राची विश्वासार्हता १०० टक्क्यांनी वाढते. म्हणूनच आम्ही देखील या माध्यमातून आपल्या संघर्षाला नवी दिशा देण्याचे आवाहन स्वीकारले आहे.
आतापर्यंत आम्ही दैनिक सामना, मुंबई चौफेर दैनिक गावकरी, दैनिक तरुण भारत,दैनिक पुढारी दैनिक मुंबई लक्षद्वीप, व इतर अनेक लोकप्रिय दैनिकात वार्ताहर म्हणून काम केले आहे.व या मध्यमातून अनेक जनतेच्या महत्वाच्या गंभीर विषयांनवर विधानसभेत तारांकित प्रश्न होऊन त्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे याव्यतिरिक्त प्रसार माध्यमातील , टीव्ही 9 मराठी , मी मराठी, ए एम न्यूज, महाराष्ट्र1, इंडिया टीव्ही यासारख्या प्रतिथयश टीव्ही चॅनेल्सवर अधिकृत पत्रकार म्हणून सेवाकार्य केले आहे. त्यामुळे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोन्हीही प्रसारमाध्यमांचा अनुभव लक्षवेधी त आम्ही खुबीने वापरून आम्ही सत्य, वास्तव आणि निःपक्षपातीने दर्जेदार वार्तापत्र आपणासाठी सादर करणार आहोत, याबद्दल खात्री आहे.
आम्ही सत्य असलेल्या बातम्यांना शासन व संबंधित यंत्रणेसमोर मांडण्याचे काम करत असताना अन्याय झालेल्या लोकांसाठी स्वतः संविधानिक मार्गाने आमरण उपोषण केले आहे. रिलायन्स गॅस पाईपलाईन मध्ये बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून ८ दिवस आमरण उपोषण केले आहे. शेतकऱ्यांना वाटप केला जाणाऱ्या युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी माजलेल्या सत्ताधीशांशी दोन हात करण्यातही आम्ही कुचराई केली नाही. जिल्ह्यातील लाखो लोकांना आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा करत आलो आहोत. नेहमीच सत्याची कास धरणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकाराची ताकत म्हणजे तुमचे माझ्यावर असलेले प्रेम आणि विश्वास होय. त्यामुळे लक्षवेधी सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज एक पाऊल पुढे टाकत आहे. माझ्या या वाटचालीत आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास असाच कायम राहावा, ही आपणास विनंती.
( योगेश चांदेकर , संपादक : लक्षवेधी)