मुंबई ः बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या विषयावर गंभीर आहेत. या प्रकरणात एका राष्ट्रीय पक्षाचा मंत्री असल्याचा संशय आहे. त्यामुळे राजकीय धुराळा उडाला आहे. माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यापूर्वीच पूजाच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची जाहीररित्या मागणी केली होती.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं आहे. त्यांनी तर त्या मंत्र्याचे नावही मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे राजकीय, सामाजिक वर्तुळासोबत बॉलीवूडचेही लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
पूजा भाजपची कार्यकर्ती होती
पूजा हिला मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं होतं. ती टिकटॉकवर स्टारही होती. तिचे खूप मोठे फॅन्स आहेत. मुंडे भगिनी यांनाही तिचे अप्रूप होते. ती त्या दोघींच्या संपर्कात आली. त्यांनी तिच्यातील कलागुणांना हेरून भाजपतमध्ये प्रवेश दिला. ती पक्षाच्या स्टेजवरून प्रचारही करीत होती. तिने राजकीय करिअर निवडले असले तरी तिला मॉडेलिंग क्षेत्रात जायचं होतं. अचानक तिची राजकीय क्षेत्रात एन्ट्री झाली.
बंजारा समाजातील ही मुलगी नंतर विदर्भातील एका राजकीय नेत्याच्या संपर्कात आली. त्या नेत्याने तिला करिअर करण्यासाठी मदत केली. त्या दोघांमधील संभाषणाचे किमान दहा अॉडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्या राजकीय नेत्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
पूजासोबत राहत होता एक युवक
पूजाच्या देखभालीची जबाबदारी एका कार्यकर्त्यावर सोपवली होती. विशेष म्हणजे तो तरूण पूजाचा नातेवाईक नव्हता. तो पूजासोबतच राहत होता. तो मूळचा बीड जिल्ह्यातील एका तांड्यावरील रहिवासी आहे. नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे समोर आलेले नाही. वानवडी पोलिस ठाण्यातील निरीक्षकांनी पूजा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचे वरिष्ठांना सांगितले आहे. तिच्या शवविच्छेदनातून तसा रिपोर्ट समोर आला आहे.