banner 728x90

बोईसर विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील यांचे पारडे जड

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर


सामान्यांचा आमदार म्हणून ओळख
मतविभागणीचा फायदा मिळणार?

banner 325x300

पालघरः बोईसर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत असून दोन शिवसेना विरूद्ध बहुजन विकास आघाडी अशा तिरंगी लढतीत मतविभागणीचा फायदा आमदार राजेश पाटील यांना होण्याची शक्यता आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात आमदार पाटील यांनी विविध विकासकामे मार्गी लावली. सामान्यांचा आमदार म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख असून त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

बोईसर विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीने आ. पाटील यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करून त्यांना उमेदवारी दिली, तर यापूर्वी दोन वेळा बहुजन विकास आघाडीतूनच आमदार झालेले विलास तरे यांनी नंतर भाजप, शिवसेना असा राजकीय प्रवास करून पुन्हा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यांची हे पक्षांतर त्यांना किती उपयुक्त ठरते, हा संशोधनाचा भाग आहे. शिवाय या मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने डॉ. विश्वास वळवी यांना उमेदवारी दिली आहे. तेही अन्य पक्षातूनच आयात झालेले उमेदवार आहेत.

शिट्टी चिन्ह पुन्हा मिळाल्याने उत्साह द्विगुणीत
आमदार राजेश पाटील या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी सुरुवातीपासून झटत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची अफवा पसरली होती; परंतु आपण शेवटपर्यंत बहुजन विकास आघाडी सोडणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाने बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे जनमाणसांत रुजलेले चिन्ह वापरण्यास परवानगी दिल्याने बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. आमदार पाटील यांना निवडून आणण्यासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत राजीव पाटील, सुरेश तरे तसेच अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींनी निवडणुकीतील प्रचाराचे नियोजन आणि व्यूहनीती आखली.

मतदारसंघात दीड हजार कोटींची कामे
गेल्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील फार थोड्या मतांनी विजयी झाले होते; परंतु आमदार झाल्यानंतर त्यांनी कामाचा झपाटा लावला. कोरोनाच्या काळात तर त्यांनी निर्बंध असतानाही जनतेत जाऊन धीर दिला. अनेकांना जेवणाचे डबे पोहोचविणे, रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, रेमेडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे अशा अनेक प्रकारची कामे त्यांनी स्वतः रणांगणात उतरून केली. कोरोना काळात मतदार संघात फारसा निधी उपलब्ध होत नव्हता; मात्र पुढील तीन वर्षात त्यांनी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघात आणून विविध विकासकामे मार्गी लावली आहेत.

अनेक गावे प्रकाशमय
आदिवासी विभागातील वाड्या-पाड्यात अनेक ग्रामपंचायती वीज पुरवतात. वीजबिल भरण्याची त्यांची ऐपत नसते. यावर आ. पाटील यांनी चांगला तोडगा काढला. सौर ऊर्जा प्रकल्पाचा निधी मतदार संघात आणून अनेक गावात सौरदिवे उभे करून त्यांनी अंधारलेली गावे प्रकाशमय केली. सुमारे दोन कोटी रुपयांच्या योजना पूर्ण झाल्या असून आणखी दोन कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अनेक गावे प्रकाशमय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रकल्पग्रस्तांची टाळली फसवणूक
पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद महामार्ग, नवी दिल्ली-मुंबई कॉरिडॉर असे अनेक पायाभूत प्रकल्प जातात. या भागातील आदिवासी आणि शेतकऱ्यांना भूसंपादनात अत्यल्प पैसे देऊन, त्यांची फसवणूक करण्यात आली. त्याविरुद्ध आ. पाटील यांनी मैदानात उतरून शेतकऱ्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत मांडल्या. प्रशासनात भूसंपादनाच्या पैशात कुठे गैरप्रकार होतात, हे त्यांनी उघडकीस आणले आणि संबंधित आदिवासी आणि शेतकऱ्यांना भूसंपादनाची योग्य रक्कम देण्यास प्रशासनाला भाग पाडले.

गावपाड्यापर्यंत पोचवली कामे
गेल्या पाच वर्षात आ. पाटील यांनी प्रत्येक गाव पाड्यापर्यंत आपली विकासकामे पोहोचवली. जलजीवन मिशन, मत्स्य विभाग, कृषी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास निधी, ठक्करबाप्पा योजना अशा वेगवेगळ्या योजनांचा अधिकाधिक फायदा लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. पालघर जिल्ह्यात अजूनही अनेक भागात आमदार हितेंद्र ठाकूर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदाही आ. राजेश पाटील यांना होत आहे.

दैनंदिन संपर्काचा फायदा
बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा शिंदे गट शिवसेनेचा ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. या तिरंगी लढतीत बहुजन विकास आघाडीचे मतदार कुठेही हलले नाही. त्यांची मतपेढी कायम आहे. आ. पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. लोकसभेच्या निवडणुकीत जरी त्यांना पराभव पत्करावा लागला असला, तरी पराभवाने अजिबात नाऊमेद न होता त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा मतदारसंघ लहान असल्याने तसेच या भागातील मतदार संघावर आ. पाटील यांची पकड असल्याने आणि त्यांचा दैनंदिन संपर्क असल्याने त्याचा फायदा त्यांना होणार आहे.

दोन्ही उमेदवार आयात
या वेळी या मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने माजी आमदार विलास तरे यांना उमेदवारी दिली आहे. तरे यांनी यापूर्वी बहुजन विकास आघाडीतून दोनदा विधानसभा निवडणूक लढवून ती जिंकली होती. त्यानंतर ते भाजपत गेले आणि पुन्हा विधानसभा उमेदवारी मिळावी याकरिता शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली असे असले, तरी गेल्या पाच वर्षात त्यांचा या मतदारसंघात फारसा संपर्क राहिलेला नव्हता. त्याच बरोबर या मतदारसंघात ठाकरे गटाने डॉ. वळवी यांना उमेदवारी दिली आहे. वळवी यांचे सामाजिक काम चांगले असले तरी ते या मतदारसंघाच्या बाहेरचे असल्याची चर्चा मतदार संघात होत आहे. शिवाय या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर बोईसर पश्चिम भागात जो सर्वाधिक मते घेतो, तोच विजयी होतो असे समीकरण आहे. पश्चिम भागात आमदार राजेश पाटील यांचे चांगले वर्चस्व आहे. पूर्व भागात सालवड, सातिवली, बिलालपाडा संतोष भुवन व धानिव विभाग या वसई तालुक्यातील ग्रामीण भागाचा समावेश होतो. या सर्वच भागात बहुजन विकास आघाडीचे आजवर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे डॉ. वळवी व तरे या दोघांना या निवडणुकीत फार मोठे आव्हान असणार आहे.

दोन्ही शिवसेनेत बंडाळी आणि भाजपची नाराजी
भाजप- शिंदे गटातील अंतर्गत कलह नाराजी, बंडाळीचाही फटका बसणार आहे. डॉ. वळवी यांना इतर पक्षातून आणून उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या दोन्ही शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी, बंडाळी आणि दोन्ही उमेदवार आयात असल्यामुळे आ. राजेश पाटील यांची बाजू मजबूत झाली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!