पालघर-योगेश चांदेकर
स्नेहा दुबे-पंडित निवडणुकीच्या रिंगणात
जनता परिवर्तन करणार असल्याचा ठाम विश्वास
पालघरः वसई विधानसभा मतदारसंघावर गेल्या तीन दशकांपासून आमदार हितेंद्र ठाकूर यांचे असलेले वर्चस्व मोडीत काढून या मतदारसंघाचा विकास करण्याच्या निर्धाराने महायुतीकडून स्नेहा दुबे-पंडित विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे वडील विवेक पंडित २००९ च्या निवडणुकीत विजयी झाले होते; परंतु २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. विकास हाच आपला प्रचाराचा अजेंडा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
वसई विधानसभा मतदारसंघातून आ. हितेंद्र ठाकूर यांना बहुजन विकास आघाडीने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांचे गेल्या साडेतीन दशकांपासून या मतदारसंघावर वर्चस्व आहे. मधला २००९ ते २०१४ चा काळ वगळला तर सातत्याने या मतदारसंघावर ठाकूर कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. २००९ च्या निवडणुकीत मात्र विवेक पंडित यांनी अपक्ष म्हणून बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. नंतर २०१४ च्या निवडणुकीत आमदार हीतेंद्र ठाकूर यांनी पंडित यांचा पराभव केला.
दशकानंतर ठाकूर-पंडित कुटुंबात लढत
आ. हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात विवेक पंडित यांच्या कन्या स्नेहा दुबे पंडित निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. एक दशकानंतर ठाकूर-पंडित कुटुंब आमने सामने आले आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून लढलेले विजय पाटील या वेळी काँग्रेसचे या मतदारसंघातील उमेदवार आहेत. मतदारसंघात तिरंगी लढत आहे.
भविष्याची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी मैदानात
स्नेहा दुबे-पंडित अतिशय संयमी पद्धतीने पूर्वाश्रमीच्या कोणत्याही राजकारण्याचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या मात्र वसईचा विकास ठप्प होण्यास संबंधितांना जबाबदार धरतात. मीरा-भाईंदर, वसई-विरार नंतर नव्या मुंबईची निर्मिती झाली. नव्या मुंबईला आता आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असताना वसई-विरार, भाईंदर-परिसराला मात्र अजूनही मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीची चिंता आहे. गेल्या ३० वर्षात या भागातील कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत, अशी टीका त्या करतात. वसईची प्रतिमा अनधिकृत इमारतींचे शहर अशी असून या भागात कायम पावसाळ्यात पावसाचे पाणी घराघरात शिरलेले असते. याशिवाय स्थानिक वाहतुकीचे प्रश्नही आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही, असे निदर्शनास आणून आपण केवळ आणि केवळ वसईच्या विकासासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत, असे त्या पटवून देतात. भूतकाळाची भुते उकरून न काढता भविष्याची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात आहोत आणि जनतेचे प्रश्न सोडवणे हेच आपले ध्येय आहे, असे त्यांनी ठिकठिकाणच्या सभेत सांगितले आहे.
ठाकुरांच्या बालेकिल्ल्यात जंगी शक्तीप्रदर्शन
गेल्या तीन दशकात मोठमोठ्या मिरवणुका ही बहुजन विकास आघाडीची मक्तेदारी झाली होती; परंतु या वेळी भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करताना स्नेहा दुबे-पंडित यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करून या लढतीत आपण आहोत हे दाखवून दिले. आपला प्रतिस्पर्धी कोण हे जनता ठरविल असे सांगताना दोन आणि तीन नंबरसाठी कोणीही लढावे, पहिल्या क्रमांकावर आपण आहोत, असा ठाम विश्वास त्या व्यक्त करतात.
‘राज्यात नरेंद्र’ साठी हवी साथ
‘देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र’ हे आपल्या परिसराचे स्वप्न असून ते साकार करण्यासाठी वसईकर निश्चितपणे भाजपवर विश्वास दाखवतील, असे सांगताना पालघर लोकसभा मतदारसंघात जसा मतदारांनी महायुतीवर विश्वास टाकला, तसाच विश्वास आता वसईकर पुन्हा महायुतीवर दाखवतील, असे त्या म्हणाल्या. पालघर जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात वसई विधानसभा मतदारसंघाचे नाव कामरूपाने घेतले जाईल. जनतेने परिवर्तनाचा निर्धार केल्यास आपण वसईचे स्वरूप बदलून दाखवू, असा विश्वास स्नेहा यांनी व्यक्त केला.
विकास, विकास आणि विकास
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सोबतच महायुतीच्या इतर नेत्यांनी आपल्याला उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वास आपण सार्थ करण्याचा निश्चित प्रयत्न करू, असे त्या ठिकठिकाणच्या सभात सांगतात आणि विकास, विकास आणि विकास हाच आपला प्रचाराचा एकमेव अजेंडा असेल, असे सांगताना प्रतिस्पर्धी उमेदवारांचा नामोल्लेख करणे टाळत आहेत.