महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. झारखंडसह राज्यातील निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होतील. विधानसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची पक्षनिहाय संख्या बघता सर्वाधिक २३७ उमेदवार मायावती यांच्या नेतृत्वातील बहुजन समाज पार्टीचे लढत आहे.
२०० उमेदवारांसह अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. उमेदवार संख्येबाबत भाजपा १४९ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
उत्तर प्रदेशनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याच्या निवडणूक लढतीत भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही छावण्यांसह एकूण 158 पक्ष रिंगणात आहेत. या पक्षांव्यतिरिक्त राज्यात 2086 अपक्ष उमेदवारही आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे) ९५, काँग्रेस १०१, तर राष्ट्रवादी (शरद पवार) ८६ जागा लढत आहे. महायुतीत भाजप सर्वात जास्त म्हणजे १४९ जागा. शिवसेना (शिंदे) ८१, तर राष्ट्रवादी (अजित पवार) ५९ जागा लढवत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितेनुसार, राज्यातील २८८ जागांसाठी एकूण ४१३६ उमेदवार रिंगणात आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएने १६१ जागा जिंकल्या होत्या. यूपीएला 98 जागा मिळाल्या होत्या. इतरांना २९ जागा मिळाल्या होत्या. यामध्ये छोट्या पक्षांना 16 जागा मिळाल्या. 13 जागांवर अपक्ष विजयी झाले होते.
आपल्याला फारतर दहा-बारा पक्षांची नावे माहिती असतात, पण या निवडणूकीत तब्बल १५८ पक्षांचे २०५० उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवारांची संख्या आहे २०८६ आणि एकूण उमेदवार आहेत ४१३६. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपाइंने ३१ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. राष्ट्रीय पक्ष असलेला माकप केवळ तीन जागा लढवत आहे. मुस्लीम मतदारांवर प्रभाव असलेला एमआयएम हा पक्ष १७ जागांवर लढत देत आहे.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून त्यामध्ये मुस्लीमधर्मीय उमेदवारांची संख्या ४२० आहे. यामध्ये अपक्ष व नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांची संख्या मोठी असून महाविकास आघाडीने ११ तर महायुतीने सहा मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे.असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM ने एकूण 17 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत.
सहा प्रमुख पक्षांव्यतिरिक्त महाराष्ट्रात एकूण १५२ छोटे पक्ष आहेत. यामध्ये टिपू सुलतान पार्टी, उत्तर भारत विकास सेना, पीस पार्टी, नेताजी काँग्रेस सेना, निर्भय महाराष्ट्र पार्टी, नॅशनल वर्ल्ड लीडर पार्टी, नॅशनल उलामा कौन्सिल, जय विदर्भ पार्टी या पक्षांचा समावेश आहे. राज्यातील 288 जागांसाठी एकूण 4136 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 3771 पुरुष, 363 महिला आणि इतर लिंगाच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे.