banner 728x90

आत्ता निवडून दिले, तर पुढची २५ वर्षे मीच आमदार “प्रकाश निकम यांचा दावा” विधानसभेची निवडणूक आदिवासी आणि गोरगरिबांच्या अस्मितेची जनतेला अभिमान वाटेल असे काम करू

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघरः विक्रमगड-विधानसभा मतदारसंघात विरोधकांनी पैशाचा वारेमाप वापर सुरू केला आहे. मी काही कोणत्या ठेकेदाराच्या किंवा नेत्याच्या पाठिंब्यावर उभा नाही. प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाचा मला पाठिंबा असून तुम्ही एकदा मला निवडून दिले, की २५ वर्ष कुणीही माझा पराभव करू शकला नाही अशा प्रकारचे काम मी या मतदारसंघात करून दाखवीन, असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी व्यक्त केला.

banner 325x300

विक्रमगड मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, की माझ्या पाठीमागे कोणी पैसेवाला नाही. ठेकेदार नाही. कोणत्या नेत्याचा मला आशीर्वाद नाही; परंतु जनसामान्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. मी दिलेला शब्द पाळतो. गेल्या काही वर्षात विक्रमगड मतदारसंघात विकासाची काहीच कामे झाले नाहीत; परंतु मागच्या वेळी डोंगरपाडा येथे येताना डांबरी रस्त्यावरूनच येईल, असे आश्वासन मी दिले होते आणि ते आश्वासन पूर्ण केले आहे.

जनता हेच आपले भांडवल
माझ्याबरोबर कष्टकरी, दीनदुबळे, दलित, आदिवासी अशा सर्वच समाज घटकांचे लोक आहेत. माझ्याकडे पैसा नसला, तरी सामान्यांचा पाठिंबा मला आहे. घरच्या भाकरी खाऊन लोक माझ्या प्रचारासाठी घरोघर फिरतात. अनेक लोकांशी संपर्क साधतात. हेच माझे भांडवल आहे. या भांडवलाच्या जोरावरच विधानसभेची निवडणूक मी जिंकणार आहे. विक्रमगड विधानसभा मतदारसंघात मी असे काम करून दाखवीन, की ज्याचा इथल्या कोणत्याही मतदाराला अभिमान वाटेल. प्रत्येक समाज घटकाची मान अभिमानाने उंचावेल, असे ते म्हणाले.

विकासाची चतुःसूत्री
प्रत्येक गावात रस्ता, वाचनालय, व्यायामशाळा आणि सभागृह ही चतुःसूत्री घेऊन मी काम करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मला युवकांची साथ हवी आहे. युवकांच्या पाठबळावर आपण मतदारसंघात काहीही करू शकतो, असा आत्मविश्वास मला आहे, असे सांगून निकम म्हणाले, की या भागातील यापूर्वीचे आमदार फक्त विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात येतात. लोकांना भुलवतात. मोठी आश्वासने देतात आणि निवडणूक संपली, की पाच वर्षे पाठ फिरवतात. माझे तसे नाही. मी कायम मतदार संघात असतो. या मतदारसंघातील प्रत्येक गावा-गावांत, वाड्या-वस्त्यांवर, आदिवासी पाड्यांवर माझा दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काच्या माध्यमातून या मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी माझ्यापर्यंत येत असतात आणि त्या अडीअडचणीवर मात करण्याचा प्रयत्न मी करीत असतो.

सन्मानासाठी निवडणुकीच्या रिंगणात
माझ्या कामाची पद्धत अशी असेल, की ज्यामुळे या मतदारसंघातील एकाही नागरिकाला असे वाटणार नाही, की आपले मत चुकीच्या व्यक्तीला दिले. एवढा विश्वास मी देऊ शकतो. हा विश्वास मी आत्तापर्यंतच्या माझ्या कामाच्या जोरावरच मिळवला आहे. विधानसभेची निवडणूक साधीसुधी नाही. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपल्या अस्मितेची लढाई आहे. आदिवासींची अस्मिता, गोरगरीब शेतकऱ्यांची अस्मिता आणि सामान्यांची अस्मिता जपायची असेल, वाढवायची असेल, त्यांचा सन्मान वाढवायचा असेल तर या निवडणुकीत प्रत्येकाने स्वतःच उमेदवार असल्याचे समजून मला मतदान करावे असे आवाहन निकम यांनी केले.

कोट
‘या भागातील गोरगरीब, आदिवासी समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी विधानसभेत आवाज उठविल. मी आमदार झालो म्हणजे या भागातील प्रत्येक नागरिक आमदार होईल. विधानसभेच्या या निवडणुकीत आताच योग्य निर्णय घेतला नाही, तर मग पुढची २५ वर्षे आपलेच नुकसान आहे. माझे काहीही नुकसान नाही. मतदारसंघातील प्रत्येकाची ही भावना झाली असून, ते माझ्यासाठी काम करीत आहेत.
-प्रकाश निकम, उमेदवार,विक्रमगड, मतदारसंघ

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!