मुंबई : महाराष्ट्राचे पुढचे पाच वर्षांचे राजकीय भवितव्य निश्चित करणारा निकाल काही तासांतच हाती येणार असताना उमेदवार, त्यांचे समर्थक, राजकीय पक्षांचे नेते अन् कार्यकर्ते यांची धाकधूक प्रचंड वाढली आहे.
‘काहीही होऊ शकते’ अशी स्थिती असलेले किमान १०० मतदारसंघ आहेत.
मतदानानंतर जसजशी राज्याच्या विविध भागातून माहिती हाती येत आहे, त्यानुसार अत्यंत अटीतटीच्या लढती झाल्या असून जात-पोटजातींचे राजकारण, पैशांचा वारेमाप वापर, त्वेषाने झालेला प्रचार, विविध ठिकाणी स्थानिक नेत्यांचे पाडापाडीचे राजकारण, लाडक्या बहिणींसह सरकारी योजनांचे लाभार्थी, जरांगे फॅक्टर, कटेंगे तो बटेंगे, शेतकऱ्यांमधील नाराजी, सरकार विरोधात मविआने पेटविलेले रान अशा विविध मुद्द्यांच्या मार्गावरून गेलेली ही निवडणूक निकाल काय देते याबाबत उत्सुकता आहे.
मुंबईवर कुणाचे वर्चस्व?
मुंबईत उद्धवसेनेला चांगले यश मिळेल, असा कल दिसून येत आहे. एकदोन सोडले तर भाजपचे बहुतेक सगळे विद्यमान आमदार जिंकतील आणि दोनतीन नवीन जागा त्यांना मिळतील. काँग्रेसला ११ पैकी किमान पाच जागा मिळतील असे चित्र आहे. आदित्य ठाकरेंचा विजय नक्की मानला जातो पण अमित ठाकरे जिंकतील याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये एकमत नाही.
मराठवाड्यात जात, शेती निर्णायक?
मराठवाड्यात जरांगे पाटील फॅक्टर लोकसभेइतका चालला नाही. काही मतदारसंघांमध्ये विशेषत: ओबीसी उमेदवार प्रभावी आहेत तिथे ओबीसी विरुद्ध मराठा अशा अटीतटीच्या लढती झाल्या. सोयाबीनच्या भावाबद्दलची तीव्र नाराजी शेतकऱ्यांमध्ये होती, ती काही ठिकाणी व्यक्त होण्याची शक्यता आहे. किमान २० मतदारसंघांत महायुती व महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त असलेल्या उमेदवारांनी उल्लेखनीय मते घेतल्यास मुख्य उमेदवारांच्या जय-पराजयाचे गणित बिघडू शकते.
पश्चिम महाराष्ट्रात ॲडव्हांटेज मविआ?
पश्चिम महाराष्ट्रात ॲडव्हांटेज मविआ असल्याचे म्हटले जाते. विशेषत: शरद पवारांबद्दल दिसून आलेली सहानुभूती ईव्हीएममध्ये जशीच्या तशी उतरली तर महायुती माघारेल. महायुतीत भाजपची कामगिरी चांगली राहील, असे चित्र आहे. राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत या भागात प्रभावी बंडखोर नाहीत.
कोकणातील सुभेदारी टिकणार?
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुरुवातीपासून भक्कम वाटणाऱ्या महायुतीला शेवटच्या टप्प्यात नेत्यांच्या आपसातील हेव्यादाव्यांनी जरा अडचणीत आणल्याचे चित्र समोर आले पण महायुतीचे स्थानिक नेते/ उमेदवार सर्व बाबतीत प्रचंड ताकदवान असून ते आपापल्या सुभेदाऱ्या टिकवतील, पण एखादी सुभेदारी खालसा होऊ शकते अशी चर्चा आहे.
विदर्भात बंडखोर समीकरणे बिघडवणार?
भाजपचा गड राहिलेल्या आणि लोकसभेला मात्र त्यांना धक्का बसला अशा विदर्भात यंदा जबरदस्त लढती आहेत. महायुतीला ॲडव्हांटेज वाटत असले तरी ६२ पैकी किमान २० लढती अशा आहेत की तिथे घासून निकाल लागतील. तिथे पारडे कोणाच्याही बाजूने झुकू शकते असे स्थानिक सूत्र सांगत आहेत. बंडखोरांनी दोन्ही बाजूंची समीकरणे विदर्भात सर्वांत जास्त बिघडवली आहेत.
उत्तर महाराष्ट्रात कोण सरस?
उत्तर महाराष्ट्रात चांगल्या कामगिरीची महायुतीला खात्री आहे. मात्र, शरद पवार गट, उद्धवसेनेच्या उमेदवारांनी किमान १० मतदारसंघांमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढविली आहे.