Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो न भविष्यती असे महाप्रचंड यश मिळालं. 288 पैकी महायुतीने 230+ जागा मिळवल्या, तर महाविकास आघाडीला फक्त 47 जागांवर समाधान मानावं लागलंय.
यातही सर्वात मोठा हादरा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसला. 86 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या पक्षाला फक्त 10 जागा मिळाल्या. या पराभवानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज अखेर मौन सोडलं.
मी घरी बसणार नाही…
कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणतात, ‘काल निकाल लागला अन् आज मी कराडमध्ये आलोय. असा निकाल लागल्यानंतर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल, असं वाटलं नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, त्यांना पुन्हा नव्यानं उभं करणं गरजेचं आहे. कर्तृत्वान पिढी उभारणं, हा माझा यापुढे कार्यक्रम राहील,’ असं शरद पवार म्हणाले.
मतांचं ध्रुवीकरण झालं…
निकाबाबत बोलताना शरद पवारांनी लाडकी बहीण योजनाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘लाडक्या बहिणांना काही रक्कम देण्यात आली आहे. यापुढे आम्ही सत्तेत आलो नाही, तर ही योजना बंद होईल, असा प्रचार महायुतीकडून करण्यात आला. त्यामुळे लोकांनी आमच्या विरोधात मतदान केले, असे वाटते. दुसरीकडे या निवडणुकीत महिलांचे मतदान वाढले आहे, असे आकडेवारीवरुन दिसत आहे. तो फायदा महायुतीला मिळाला आङे. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले, त्याचा फायदाही महायुतीला झाला.’
EVM ची माहिती घेऊन बोलेन…
निकालानंतर उद्धव ठाकरेंसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी निकालांवर संशय व्यक्त करत EVM चा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘जोपर्यंत माझ्याकडे अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत मी या विषयावर काही बोलणार नाही.’ विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर शरद पवार निवृत्ती होणार? ही चर्चा सुरु झाली. त्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणतात, ‘माझ्या निवृत्तीची वेळ विरोधकांनी सांगू नये.’
अजितदादांच्या विजयावर शरद पवार म्हणतात…
अजित पवारांच्या पक्षाला जादा जागा मिळाल्या, यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नाही. अजितदादांच्या जागा जास्त आल्या आहेत, हे अमान्य करण्याची गरज नाही. पण राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. कुणीतरी बारामतीत उभं राहणं गरजेचं होतं. तिथं कुणीलाही उभं केलं नसतं, तर महाराष्ट्रात मेसेज काय गेला असता. युगेंद्र आणि अजितची तुलना होऊ शकत नाही, हे आम्हाला माहीत होतं. अजित पवार यांचं अनेक वर्षापासूनचं राजकारण, सत्तेतील सहभाग आणि दुसऱ्या बाजूला नवखा तरुण हे आम्हाला माहीत आहे, असं शरद पवार म्हणाले.