Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट आली असून याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. तापमानात थोडी वाढ झाली असली तरी थंडीचा कडाका कायम आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत गारठा वाढला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळं मध्य भारतापर्यंत गारठा वाढला आहे. तर पूर्वोत्तर राज्यांमध्येही किमान तापमानाच घट होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात गुरुवारी अहिल्यानगरचे तापमान सर्वात कमी होते. या ठिकाणी ७.५ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र आज नैऋत्य व लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर स्थित आहे. तर पुढील १२ तासांत ते उत्तर तामिळनाडू ते आंध्र प्रदेश किनारपट्टी लगत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात चारही उपविभागात पुढील पाचवा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानात दोन ते तीन डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार-पाच दिवस राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कोकण व रत्नागिरीतील तापमानात वाढ झाली आहे. तर राज्यात इतर जिल्ह्यात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील ४८ तासांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळू हळू थंडी कमी होणार आहे. राज्यात परभणी, निफाज, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथेही थंडी वाढली आहे. विदर्भसुद्धा थंडीचा कडाका वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे.
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली आहे. येत्या १२ तासांत हे चक्रीवादळ वायव्येकडे तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर २४ तासांत हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर उत्तरेकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, पश्चिमी विक्षोभामुळे थंडीची स्थिती वाढू शकते. अनेक भागात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवस डोंगरांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबररोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि रायलसीमा येथेही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या २१ डिसेंबर रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे. आसाम आणि मेघालयमध्ये २१ ते २३ डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या बहुतांश भागात किमान तापमान ० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदले गेले आहे. तर उत्तर भारतातील इतर भागात किमान तापमान १ ते ६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. पंजाबमधील आदमपूर येथे किमान तापमान २.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे देशातील मैदानी भागात सर्वात कमी आहे.
हवामान खात्याने हिमाचल प्रदेशात २३ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर पश्चिम राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये २५ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. २० आणि २२-२४ डिसेंबरला पंजाब आणि हरयाणामध्ये दाट धुक्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २० ते २२ डिसेंबर दरम्यान उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे.