banner 728x90

ब्राह्मण समाज पुरोगामी विचाराचा आमदार स्नेहा दुबे-पंडित यांचे कौतुकोद्‌गार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पालघर जिल्ह्याचे स्नेहसंमेलन

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघरः ब्राह्मण समाज हा पुरोगामी विचाराचा आहे. त्याने समाजाला दिशा दिली. सतीबंदीसारखे अनेक पुरोगामी कायदे करण्यात या समाजाचा मोठा वाटा आहे. संपूर्ण हिंदू समाजाचे नेतृत्व ब्राम्हण समाजाने केले, असे कौतुकोद्‌गार आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी काढले.

banner 325x300

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पालघर जिल्हा शाखेचे स्नेहसंमेलन डहाणू तालूक्यातील चिंचणी येथे आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी आमदार स्नेहा दुबे-पंडित बोलत होत्या. या वेळी ब्राह्मण महासंघाचे मुंबई अध्यक्ष बाबा जोशी, पालघर जिल्हाध्यक्ष दिनेश पाठक,पालघर जिल्हा कार्याध्यक्ष निवृत्ती जोशी, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अमृता देशपांडे, कायदा सल्लागार ॲड. संयुक्ता तामोरे, संध्या शहापुरे, वृषाली जोशी,सुनीता घारपुरे,कोमल जोशी, धनंजय गोखले,हेरंभ जोशी,हर्षल ओझा, आदी उपस्थित होते.

‘एक है तो सेफ है’ ब्राम्हण समाजालाही लागू
स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य काळातही ब्राह्मण समाजाने पुरोगामी निर्णय कसे घेतले, याची अनेक उदाहरणे देऊन आ. स्नेहा दुबे-पंडित यांनी महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य कसे आहे हे सांगितले. एक मे २०२४ नंतर जन्मलेल्या आपत्याच्या नावापुढे वडिलांसोबतच आईचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला, त्यासाठी मी १४ वर्षे लढा दिल्याचे सांगून त्या म्हणाल्या, मी आमदार होण्याअगोदरच राज्य सरकारने याबाबात निर्णय घेतला. सतीबंदी कायद्यासह अनेक पुरोगामी कायदे करण्यामध्ये ब्राह्मण समाजाचे मोठे योगदान आहे. ब्राह्मण समाज अधिक संघटित झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ एक है तो सेफ है’हे घोषवाक्य लक्षात घेऊन आपणही त्याच पद्धतीने समाज संघटित केला पाहिजे.

पालघरमधल्या विठ्ठल मंदिराचे दरवाजे आम्ही अगोदरच केले खुले
हिंदू संस्कृती ही जीवन जगण्याची पद्धत असून तिचा अधिकाधिक प्रसार करून त्यात अनेकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी ब्राह्मण समाजाने पुढाकार घ्यायला हवा. विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व समाज घटकांना खुले व्हावे, यासाठी साने गुरुजींनी आंदोलन केले. साने गुरुजींनी कायम तळागाळातील घटकाच्या उन्नतीचा विचार केला, तोच विचार माझे आजोबा गजानन पंडित आणि वडील विवेक पंडित यांनीही केला. पालघर जिल्ह्यातील विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्वात अगोदर सर्व धर्मियांसाठी खुले करण्यामध्ये पंडित कुटुंबाचा मोठा वाटा होता. त्यात ब्राम्हण समाजाची साथ होती. साने गुरुजींच्या विचारसरणीचा आमच्यावर प्रभाव असल्यामुळे ती विचारसरणी घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्तुत्व आपल्याला माहिती आहे आणि त्यांचा केवळ आपल्या समाजात नव्हे, तर राज्यालाही अभिमान वाटायला हवा, असे मत आ.स्नेहा दुबे-पंडित यांनी व्यक्त केले.

अमृत योजनेचा फायदा घ्या
या वेळी ब्राह्मण महासंघाचे मुंबईचे अध्यक्ष बाबा जोशी म्हणाले, की महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे ब्राह्मण भवनाची उभारणी करावी. अमृत योजनेबाबत अद्याप फारशी माहिती नाही. सुशिक्षित ब्राह्मण समाजाने या योजनेची माहिती करून घेऊन त्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. अमृत योजनेत राज्य सरकार मोठ्या प्रमाणात निधी देत असून या निधीचा विनियोग होण्यासाठी अधिकाधिक फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले

ब्राम्हणांसाठीही ‘ॲट्रासिटी’प्रमाणे कायदा करा
या वेळी ब्राह्मण समाजातील पुरोहितांना पेन्शन देण्यात यावी तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कायदा ब्राह्मणांच्या बाबतीत व्हायला हवा अशी मागणी करण्यात आली. ब्राह्मण समाजाला आता वेगवेगळ्या पद्धतीने हिणवले जाते. शिवीगाळ केली जाते. त्याला अटकाव करण्यासाठी ॲट्रॉसिटीसारखा कायदा ब्राह्मण समाजाच्या बाबतीत व्हायला हवा, अशी मागणी या एकदिवशीय स्नेहसंमेलनात करण्यात आली

ब्राम्हण महासंघाच्या राज्याच्या अध्यक्षपदी लातूरकर
दरम्यान, ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष मोहिनी पत्की यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याने निखिल लातूरकर यांची त्यांच्या जागी बिनविरोध निवड करण्यात आली.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!