मुंबई : महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारास व खातेवाटपास १५ दिवस झाल्यानंतरही मुहूर्त मिळून खातेवाटप जाहीर झाले असले तरी अजूनही १८ मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही.
या मंत्र्यांमधील अनेकजण विश्रांतीसाठी परदेशी वारीला गेले असल्याची माहिती मिळत आहे.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मात्र, आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालने देण्यात आली असली, तरी अजूनही १८ मंत्र्यांनी पदाची सूत्रे हाती घेतलेली नाहीत. त्यामुळे हे मंत्री नाराज आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री दत्तात्रय भरणे हे परदेशी वारीला गेले आहेत. नाराज असल्यानेच भरणे यांच्याकडून पदभार स्वीकारण्यास विलंब करण्यात येत आहे अशी चर्चा होत आहे. अशीच चर्चा अन्य काही मंत्र्याबाबतही होत आहे.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षातील राहिलेल्या दोन दिवसांमध्ये मंत्र्याकडून पदभार स्वीकारला जाण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, त्याआधीही या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नव्हता.
पदभार न स्वीकारलेले
आशिष शेलार, अतुल सावे, नरहरी झिरवाळ, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, दादा भुसे, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, योगेश कदम, पंकज भोयर, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर
पालकमंत्रिपदावरून कुरघोड्या शक्य
मंत्रिपदानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रिपदावरून वाद सुरू असल्याचे समजते. यावरून काही जिल्ह्यांत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पकड प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रिपद हवे आहे.