मुंबई : Mumbai BMC Election आगामी मुंबई महापालिका निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाण्याची भाषा शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांकडून केली गेली. त्यानंतर महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेही आघाडी नाही झाली तर स्वबळावर लढण्याची तयारी चालविली आहे, अशी माहिती पक्षाचे कार्यालयीन चिटणीस रवींद्र पवार यांनी दिली आहे.
शनिवारी पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मुख्य प्रवक्ते अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात बैठक घेतली. बैठकीला मुंबई अध्यक्षा राखी जाधव, मुंबईतील सर्व सहा जिल्हाध्यक्षांसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. प्रत्येक जिल्हाध्यक्षांकडे ३६ प्रभागांची जबाबदारी आहे. प्रभागात नगर- सेवक पदासाठी इच्छुक व्यक्तींची माहिती जमा करावी, अशा सूचना यावेळी सुळे यांनी दिल्या, तर आपण महाविकास आघाडीतून लढणार आहोत, पण आघाडी नाही झाली तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे जयंत पाटील म्हणाले. मुंबईत राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. तसेच मुंबई महापालिकेत अखंड राष्ट्रवादीचे २२७ पैकी केवळ ९ नगरसेवक होते.