महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचे प्रवासभाडे आता १५ टक्क्यांनी (१०० रुपयात १५ रुपयांची वाढ) वाढणार आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळाने दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे.
त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नववर्षात वाढीव दराने प्रवास करावा लागेल, हे निश्चित आहे.
लालपरीतून लाडक्या बहिणींना ५० टक्क्यांच्या सवलतीत प्रवास आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, मुलींनाही सवलत असून ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना १०० टक्के सवलत आहे. ६५ ते ७४ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना तिकीट दरात ५० टक्के सवलत आहे. दरम्यान, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तुलनेत लालपरीचा तिकीटदर खूपच कमी आहे. ‘ना नफा – ना तोटा’ या तत्त्वावर लालपरी सामान्यांची सेवा करीत आहे. पण, आता महामंडळाच्या ताफ्यात पुढील सहा महिन्यांत २५०० बसगाड्या दाखल होणार असून, त्या गाड्यांच्या देखभाल- दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी व महामंडळाच्या खर्च व उत्पन्नातील तूट काही प्रमाणात कमी व्हावी या हेतूने १५ टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणास पाठविला आहे. या प्राधिकरणात राज्याच्या अर्थ व परिवहन विभागाचे सचिव आणि परिवहन आयुक्त आहेत.
सध्या परिवहन महामंडळाला दररोज २८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असून, भाडेवाढीच्या निर्णयानंतर महामंडळाच्या उत्पन्नात दररोज दोन कोटी रुपयांची भर पडणार आहे. सध्या जुनाट बसगाड्यांमुळे उत्पन्नातील जवळपास ६५ टक्के हिस्सा देखभाल- दुरुस्तीवरच खर्च होत आहे. त्यामुळे नववर्षात (३० जानेवारीपर्यंत) महामंडळाच्या ताफ्यात ३०० नवीन साध्या बसगाड्या दाखल होऊन प्रवासी सेवा देतील.
परिवहन महामंडळाची सद्य:स्थिती
एकूण बसगाड्या
१४,०००
दररोजचे प्रवासी
५५ लाख
दररोजचे सरासरी उत्पन्न
२८ कोटी
भाढेवाढीनंतर वाढणारे उत्पन्न
दररोज २ कोटी
२०२५-२६ पर्यंत १००० बसगाड्या भंगारात
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या १४-१५ वर्षे पूर्ण झालेल्या शेकडो बसगाड्या आहेत. त्यामुळे बहुतेक मार्गांवर वाटेतच बस बंद पडल्याचे चित्र दररोज पाहायला मिळते. परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आगामी सहा-सात महिन्यांत अडीच हजार साध्या बसगाड्या दाखल होणार आहेत. त्यातील ३०० बस जानेवारीअखेर येतील. दुसरीकडे, परिवहन महामंडळाकडील तब्बल एक हजार बसगाड्यांचे १५ वर्षांचे आयुर्मान २०२५-२६ पर्यंत संपणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.