पालघर-योगेश चांदेकर
पालघरः मोडगाव येथील ‘परिवर्तन ग्रुप’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी क्रिकेटच्या महासंग्रामात ६४ संघांनी भाग घेतला. आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषकाचा मानकरी डहाणू तालुक्यातील चिखले येथील मनस्वी एंटरप्राइजेस संघ ठरला. या संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
‘परिवर्तन ग्रुप’ दरवर्षी संदीप भुरभुरे स्मृती चषक स्पर्धा भरवत असतो. गेली २४ वर्षे हा उपक्रम अखंड चालू असून पुढचे वर्ष हे या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या स्पर्धेचे सर्व नियोजन ‘परिवर्तन ग्रुप’चे अध्यक्ष ॲड. काशिनाथ चौधरी हे करत असतात.
दोन राज्ये एका केंद्रशासित प्रदेशातील संघ सहभागी
दादरा नगर हवेली, गुजरात, नंदुरबार, रायगड, मुंबई, मालाड, ठाणे, भिवंडी, नाशिक, जव्हार, वाडा, शहापूर, पालघर, वसई, बोईसर, डहाणू, तलासरी आदी ठिकाणचे संघ या स्पर्धेत भाग घेत असतात. दरवर्षी ही स्पर्धा नीटनेटक्या नियोजनाने चर्चेत असते. या वर्षी या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील मिळून ६४ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.
दादरा नगर हवेली, गुजरातच्या संघालाहा पारितोषिक
आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम २०२४ आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषक डहाणूच्या मनस्वी इंटरप्राईजेस चिखले या संघाने मिळवला, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दादरा नगर हवेलीतील प्रिन्स खानवेल या संघाने मिळवला. तिसरा क्रमांक वसईच्या बेनापट्टी संघांनी मिळवला, तर चौथा क्रमांक गुजरातच्या खेडगाव नवसारी येथील संघाने मिळवला. या स्पर्धेत मनस्वी स्पोर्टस् चिखले डहाणू येथील संघ मालिकावीर ठरला.
या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण
स्पर्धेचे पारितोषिक वितरण डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले, विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील भुसारा, पालघरचे माजी आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ‘परिवर्तन ग्रुप’चे अध्यक्ष ॲड. काशिनाथ चौधरी, डहाणू पंचायत समिती सभापती आणि ‘परिवर्तन ग्रुप’चे कार्याध्यक्ष प्रवीण गवळी, उपसभापती पिंटू गहला आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
भुरभुरे यांचे मोठे योगदान
गेल्या २४ वर्षांपासून आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम सुरू असतो. सुरुवातीच्या काळात संदीप भुरभुरे यांचा या स्पर्धेच्या नियोजनात मोठा सहभाग होता. त्यांचे प्रोत्साहन होते. मैदानापासूनच्या सर्वच गोष्टी ते हाताळत असत; परंतु कोरोनाच्या काळात त्यांचे पाच मे २०२१ रोजी निधन झाले. ॲड. काशिनाथ चौधरी यांनी त्यांच्याच नावाने पुढे स्पर्धा चालू ठेवत या चषकाला संदीप भुरभुरे स्मृती चषक असे नाव दिले. आता त्याच नावाने ही स्पर्धा होत असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी दोन राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेशातील संघ सहभागी होत असतात. हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.