नागपूर: नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session) आजचा चौथा दिवस दिशा सालियन प्रकरणाने चांगलाच गाजला. विधानपरिषदेत बोलताना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉरमेशनन्वये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा (Disha Salian Case) मुद्दा चर्चेस घेतला. मात्र सभापतींनी हा मुद्दा चर्चेसाठी घेण्यास नकार दिल्याने प्रविण दरेकर (Pravin Darekar) चांगलेच आक्रमक झाले. सभापतींच्या वेलजवळ जमून ‘न्याय द्या, न्याय द्या’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना आ. प्रविण दरेकर म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ बाहेर येत आहे. बिहार पोलिसांच्या तपासणीत सुशांतचा मृत्यू होण्यापूर्वी रियाच्या फोनवर 44 वेळा कॉल्स आले आहेत. बिहार पोलिसांच्या तपासणीत, निष्कर्षात सिद्ध झाले आहे की ‘AU’ म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे. आम्हाला माहिती हवी आहे की, बिहार पोलिसांचा जो निष्कर्ष आलाय तो महाराष्ट्र पोलिसांनी तपासून घ्यावा. एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. तीच मागणी आज सभागृहात केली. जोपर्यंत सरकार एसआयटीद्वारे चौकशी लावत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा दरेकर यांनी घेतला होता.
तसेच ते पुढे म्हणाले की, आमच्या अनेक नेत्यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी प्रश्न उपस्थित केले. सीसीटीव्ही फुटेजचे काय झाले?, शवविच्छेदन अहवालाचे काय झाले? परंतु सत्ता असल्याने हे विषय दडपले गेले. पण सत्य हे सत्य असते हे पुन्हा एकदा बिहार पोलिसांच्या तपासणीतून बाहेर आले आहे. ‘AU’ म्हणजे जे रियाच्या कॉल्सवर आलेय ते आदित्य उद्धव ठाकरे आहेत. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, या मागणीचा पुनःरूच्चारही दरेकर यांनी यावेळी केला.